22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईला आता जगाचे आर्थिक केंद्र बनविणार

मुंबईला आता जगाचे आर्थिक केंद्र बनविणार

पंतप्रधान मोदींचा संकल्प, महाराष्ट्र देशाचे पॉवर हाऊस

– पंतप्रधानांच्या हस्ते २९ हजार कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन व लोकार्पण

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्राने सर्वच क्षेत्रात देशाला दिशा दिली आहे. महाराष्ट्र हे देशाचे पॉवर हाऊस आहे. मुंबईला जगाचे फिनटेक कॅपिटल करण्याचे, मुंबईला जगाची आर्थिक राजधानी बनवण्याचे आपले स्वप्न असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत बोलताना केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईतील २९ हजार कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले.
देशाचे पंतप्रधान म्हणून तिस-यादा शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी आज पहिल्यांदाच मुंबईत आले होते. मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणा-या महत्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणारा ठाणे-बोरिवली बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे हा सोहळा झाला. यावेळी राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबईचे पालकमंत्री व मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई उपनगराचे पालकमंत्री व मंत्री दीपक केसरकर यांच्यासह महायुतीचे खासदार, आमदार उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते पंतप्रधानांना शाल, फेटा व छत्रपती शिवाजी महाराज व बोरिवली-ठाणे दुहेरी बोगद्याची प्रतिकृती भेट देऊन सत्कार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल सेतू, कोस्टल रोड अशा प्रकल्पातून मुंबई व नजीकच्या क्षेत्रातील कनेक्टीव्हीटी चांगली होत असल्याचे सांगताना महाराष्ट्र सरकारने पायाभूत सुविधा प्रकल्प उभारणीत केलेल्या कामाची प्रशंसा केली. दोन आठवड्यांपूर्वी केंद्र सरकारने वाढवण बंदराला मंजुरी दिली. ७६ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे १० लाख रोजगार निर्माण होतील, असे पंतप्रधान म्हणाले.
आमच्या सरकारच्या तिस-या टर्मचे गुंतवणूकदारांनी स्वागत केले आहे. लोकांना माहिती आहे, एनडीए सरकारच स्थिरता देऊ शकते, मी तिस-यांदा शपथ घेतली तेव्हा सांगितले होते. आम्ही तिप्पट वेगाने काम करू. महाराष्ट्राजवळ गौरवशाली इतिहास आहे, महाराष्ट्रात सशक्त वर्तमान आहे आणि महाराष्ट्राजवळ समृद्ध विकासाचे स्वप्न आहे. महाराष्ट्राचा विकसित भारतात मोठा वाटा आहे, महाराष्ट्रात उद्योग, शेती, फायनान्स सेक्टरची पॉवर आहे. म्हणून मुंबई ही पॉवर हब आहे. महाराष्ट्राला जगाचे सर्वात मोठे आर्थिक पॉवर हाऊस तयार करायचे आहे. मुंबईला जगाचे फिनटेक कॅपिटल करण्याचे माझे स्वप्न आहे, असे मोदी म्हणाले.

वारक-यांना मराठीतून शुभेच्छा !
तीर्थक्षेत्रांचा विकास झाला पाहिजे, सुविधा वाढल्या पाहिजे. आज पंढरपूर वारीत लाखो वारकरी भक्तीभावाने सामील झाले आहेत. संत ज्ञानेश्वर व तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम सुरू असून लवकरच हे मार्ग वारक-यांंसाठी खुले केले जातील, असे मोदींनी म्हटले. यावेळी मराठीत वारक-यांना शुभेच्छाही दिल्या. सर्व वारक-यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि पंढरीच्या विठ्ठलाला प्रणाम करतो, असे मोदी म्हणाले.

खोटे नरेटिव्ह पासरवणारांची बोलती बंद
महाराष्ट्र सरकारने प्रत्येक वर्षी १० लाख तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचा संकल्प केला आहे. या प्रशिक्षणादरम्यान शिष्यवृत्ती दिली जाणार आहे, कौशल्य विकास प्रशिक्षण ही आपली जरूरत आहे. गेल्या चार ते पाच वर्षांत कोरोनासारख्या संकटानंतर भारतात रेकॉर्ड ब्रेक रोजगार निर्मिती झाली आहे. खोटा नरेटीव्ह पसरवू पाहणा-यांची या आकड्यांमुळे बोलती बंद झाली आहे, असे मोदी म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR