मुंबई : प्रतिनिधी
महिला आयपीएल म्हणजेच वुमेन्स प्रिमिअर लीगच्या फायनलमध्ये मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा ८ धावांनी पराभव केला. मुंबईने दुस-यांच्या डब्ल्यूपीएल ट्रॉफीवर नाव कोरले तर दिल्ली कॅपिटल्सला सलग तिस-यांदा फायनलमध्ये पराभव स्विकारावा लागला.
मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना १४९ धावा केल्या होत्या. मुंबईच्या १४९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सचा संघ ८ धावांनी दूर राहिला. हा सामना शेवटच्या षटकापर्यंत गेला. दिल्लीने हाती आलेला सामना गमावला, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
नाणेफेक हरल्यानंतर मुंबईचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. खराब सुरुवातीनंतर कर्णधार हरमनप्रीत कौर आणि नॅट सायव्हर ब्रंट यांनी ८९ धावांची भागीदारी करून मुंबईला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. एकीकडे हरमनप्रीतने कर्णधारपदी ६६ धावांची खेळी केली तर दुसरीकडे स्कायव्हर-ब्रंटने ६० धावा ठोकल्या. मुंबईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी दिल्लीचा संघ मैदानात उतरला तेव्हा मारिजने कॅप आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांच्याशिवाय कोणीही मोठी खेळी करू शकले नाही.