23.6 C
Latur
Saturday, October 5, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबई, कोकणात मुसळधार

मुंबई, कोकणात मुसळधार

ठाणे, पालघरमध्ये नद्यांना पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला
ठाणे/सिंधुदुर्ग/कोल्हापूर/नागपूर : प्रतिनिधी
नवी मुंबई, ठाणे, पालघर यासह संपूर्ण कोकणात आणि विदर्भात नागपूर, धुळ््यासह ब-याच भागात मुसळधार पाऊस झाला. यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढला असून, कोल्हापुरात पंचगंगेला पूर आला. या पावसामुळे नवी मुंबई, ठाण्यापासून ते कोकणापर्यंत सर्वत्र पाणीच पाणी झाले असून, नद्या, ओढे, नाल्यांना पूर आल्याने रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. तळ कोकणातही जवळपास २७ गावांचा संपर्क तुटला आहे.

नवी मुंबईत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे रस्त्यांना नदीचे स्वरूप आले. त्यामुळे वाहनधारकांची तारांबळ उडाली. ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मुरबाडहून वाशिंदकडे जाणा-या रस्त्यावरील चिखले गावातील काळू नदीवरील पूल पुराच्या पाण्याखाली गेला. त्यामुळे शहापूर तालुका आणि मुरबाड तालुक्यातील सुमारे १८ गाव-पाड्यांचा संपर्क पहाटेपासून तुटला. जिल्ह्यात २ दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. तसेच वसई भागात तानसा नदीला पूर आल्याने शेतात कामासाठी गेलेले नागरिक नदीपल्याड अडकले. त्यानंतर तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले. पावसामुळे काही भागांतील रेल्वे वाहतूकही ठप्प झाली.

तळकोकणातही मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील कसाल या ठिकाणी हायवे लगत असलेला डोंगर कोसळून महामार्ग ठप्प झाला. तसेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर ओरोस येथे पाणी आल्याने महामार्ग ठप्प झाला होता. जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत असल्याने सावंतवाडी शहरालगत असलेल्या नदीपात्राने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे शहरात घरांमध्ये पाणी शिरले. कुडाळ तालुक्यातील वेताळ-बांबर्डेत घरांना पुराचा वेढा पाहायला मिळत आहे. कुडाळ-माणगाव खो-यातील निर्मला नदीला मोठा पूर आला. त्यामुळे २७ गावांचा संपर्क तुटला.

विदर्भात आज जोरदार पाऊस झाला. जोरदार पावसामुळे सखल भागात पाणीच पाणी झाले. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. रविवारपासून नागपूर शहरासह विदर्भात मान्सून जोर पकडणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवलात होता, तो खरा ठरला. विदर्भात १० जुलैपर्यंत सर्वदूर दमदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भात आज पाऊस पडत असल्याने दिलासा मिळाला आहे. यासोबतच धुळे जिल्ह्यातही आज मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले.

पंचगंगेला पूर
कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सकाळच्या सुमारास पंचगंगा नदी पात्राबाहेर पडली असून पंचगंगा नदीची पाणी पातळी रविवारी दुपारी १२ वाजता २८ फूट ७ इंचावर गेली होती. कोल्हापूर शहरातील पंचगंगा घाट येथे पाणी पात्राबाहेर पडल्याने आजूबाजूच्या परिसरात पाणी शिरत आहे.

मराठवाड्यात प्रतीक्षाच
मराठवाड्यात पावसाळ््याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला. परंतु सध्या तुरळक ठिकाणीच पाऊस पडत आहे. मात्र, पावसाचा जोर वाढत नसल्याने ब-याच भागांत मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. तसेच प्रकल्पही कोरडे असल्याने पिण्याच्या पाण्याचीही चिंता आहे. दरम्यान, लातूर शहर परिसरात रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. मात्र, पावसाचा जोर कमीच आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR