लातूर : प्रतिनिधी
‘माझ्या गावची चिंच दुसरीकडे कुठेच मिळत नाही’, असे उद्गार पटडी उत्पादक संघाचे अध्यक्ष उमाकांत कुलकर्णी यांनी सत्कार करतांना व्यक्त केले होते. तोच धागा पकडून जिल्हाधिकारी म्हणाल्या ‘माझ्या गावची चिंच दुसरीकडे कुठेच मिळत नाही’ असे आत्मविश्वासाने सांगणे म्हणजेच आपल्या प्रॉडक्टचे ब्रॅण्डिंग असते. ही टॅग लाईन फक्त्त पुण्या-मुंबईत नाही, तर आपले शेतकरीही करु शकतात, याच हे उदाहरण असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी लातूर जिल्ह्यातील उद्योजकांच्या एक दिवशीय कार्यशाळेत बोलताना केले.
जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने लातूर जिल्हा उद्योग समूह इमारतीत आयोजित ‘इग्नाइट महाराष्ट्र’ या उद्योजकांना आणि नव उद्योग उभे करु इच्छिणा-यांसाठी भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देणा-या कार्यशाळेत जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे बोलत होत्या. उद्योग विभागाचे सहसंचालक बी. टी. यशवंते, उद्योग विभागाच्या मैत्र प्रकल्पाचे नोडल अधिकारी उपसंचालक दीपक जाधव, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक पी. डी. हणभर यांच्यासह विविध उद्योग विषयातील तज्ज्ञ यावेळी उपस्थित होते.
लातूर जिल्हा औद्योगिक दृष्ट्या पुढे जाण्यासाठी ज्या-ज्या गोष्टीची गरज लागेल, त्या त्या गोष्टीचा पाठपुरावा जिल्हा प्रशासनाकडून शासनाकडे केला जाईल. लातूर जिल्ह्यातील तालुका स्तरावरील एम. आय. डी. सी. अधिक मजबूत करण्याचे शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. शासनाने चाकूर, जळकोट एमआयडीसी मंजूरी बरोबर जिल्ह्यातील एम.आय.डी.सी. विस्तारीकरणासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. पण ब्रँण्डिंग हा विषय अत्यंत महत्वाचा असून आता एग्रो बेस प्रॉडक्ट अधिकाधिक निर्यात कसे होतील, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी असे प्रशिक्षण महत्वाची भूमिका बजावत असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी यावेळी सांगितले.
लातूर जिल्ह्यातील बोरसुरी डाळ, पटडी चिंच, कास्ती कोथिंबीर उत्पादक संघाला जी. आय. मानांकन मिळाल्या बद्दल आनंद व्यक्त करतांना जिल्हाधिकारी म्हणाल्या, या तीन कृषी उत्पादनाला भौगोलिक मानांकनाने जिल्ह्याचा बहुमान झाला आहे. यातून अनेक शेतक-यांना प्रेरणा आणि बळ मिळाले आहे. जिल्हा प्रशासन, कृषी विभाग, या तीनही उत्पादक संघ यांच्या प्रयत्नातून हे जी. आय. मानांकन मिळाले, त्यासाठी सर्वांचे अभिनंदन करुन या तीनही कृषी उत्पादनाचे उत्तम ब्रँण्डिंग व्हावे, यासाठी प्रशासन स्तरावरुनही आपण प्रयत्न करु, अशी ग्वाही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्योग विभागाचे सहसंचालक बी. टी. यशवंते यांनी केले.