23.8 C
Latur
Monday, August 11, 2025
Homeमहाराष्ट्रमुंबई पोलिस यंत्रणा ‘अलर्ट मोड’वर

मुंबई पोलिस यंत्रणा ‘अलर्ट मोड’वर

सण, उत्सवांसाठी जय्यत तयारी

मुंबई : प्रतिनिधी
देशाची आर्थिक राजधानी मुंबई पुढील आठवड्यापासून उत्सवांच्या रंगात रंगणार आहे. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन आणि १६ ऑगस्टला दहीहंडी उत्सवाने उत्सवाचा हंगाम सुरू होईल. त्यानंतर गणेशोत्सव, नवरात्र, दसरा आणि दिवाळीसारखे प्रमुख सण येतील. याप्रसंगी होणारी प्रचंड गर्दी आणि उत्साह पाहता, मुंबई पोलिसांनी सुरक्षा आणि सुव्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी व्यापक तयारी सुरू केली आहे.

मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्या अध्यक्षतेखाली सणांच्या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय गुन्हेगारी बैठक झाली. यावेळी वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. या बैठकीला डॉ. आरती सिंह, सत्यनारायण चौधरी, धनंजय कुलकर्णी उपस्थित होते. आयुक्तांनी स्पष्ट सूचना दिल्या की, उत्सवादरम्यान संपूर्ण शहरात पोलिसांची उपस्थिती स्पष्टपणे दिसून यावी. त्यांनी अधिका-यांना जनतेशी कडक पण सभ्य वृत्ती बाळगण्याचे आणि नागरिकांच्या तक्रारींकडे त्वरित लक्ष देण्याचे आदेश दिले. तसेच, उत्सवाच्या कार्यक्रमांना वेळेवर परवानगी देण्याचे आणि नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.

स्वातंत्र्यदिनाची तयारी
१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. सार्वजनिक ठिकाणी, महत्त्वाच्या इमारतींमध्ये आणि गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात येईल. संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी गुप्तचर यंत्रणा अधिक सक्रिय करण्यात आली आहे.

गणेशोत्सवावर विशेष लक्ष
२७ ऑगस्टपासून सुरू होणारा आणि १० दिवस चालणारा गणेशोत्सव हा मुंबईतील सर्वांत मोठा आणि भव्य उत्सव आहे. या काळात लाखो लोक गणेश मंडळांमध्ये दर्शनासाठी येतात. आवश्यक त्या सर्व सुरक्षा उपाययोजना राबविण्याचे निर्देश पोलिस दलाला देण्यात आले आहेत. ६ ऑगस्ट रोजी गणेश मंडळांसोबत झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. प्रत्येक गणेश मंडळासाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा रक्षकांची नियुक्ती अनिवार्य करण्यात आली आहे. महिलांच्या सुरक्षेला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. विसर्जन मिरवणुकीसाठी निश्चित मार्ग निश्चित केले जातील.

संशयास्पद हालचालींची माहिती द्या
मुंबईकरांनी सुरक्षित आणि उत्साही वातावरणात सणांचा आनंद घ्यावा हा आमचा उद्देश आहे. यासाठी पोलिस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. कोणत्याही संशयास्पद हालचालीची तात्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार करा. – देवेन भारती, मुंबई पोलिस आयुक्त

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR