26.8 C
Latur
Friday, April 4, 2025
Homeक्रीडामुंबई संघाला पुन्हा एकदा दणका

मुंबई संघाला पुन्हा एकदा दणका

आवेश खानने मुंबईला रोखले, लखनौ विजयी
मुंबई : लखनौ सुपर जायंट्स संघाने मुंबई इंडियन्स विरूद्ध नाट्यमय सामन्यात अखेरच्या षटकात शानदार विजय मिळवला. लखनौने मुंबई इंडियन्सवर १२ धावांनी विजय मिळवत मोसमातील दुसरा विजय नोंदवला. लखनौसमोर मुंबई इंडियन्सचा रेकॉर्ड कायमच खराब राहिला. आवेश खानने अखेरच्या षटकात कमालीची गोलंदाजी करत मुंबईला पराभवाचा दणका दिला.

मुंबई इंडियन्सला अखेरच्या षटकात २२ धावांची गरज होती. आवेश खानकडे गोलंदाजी करण्याची जबाबदारी आली. आवेशच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिकने षटकार लगावला. यानंतर हार्दिकने २ धावा घेतल्या. तिस-या चेंडूवर हार्दिकने धाव घेण्यास नकार दिला. चौथ्या चेंडूवर मोठा फटका मारायला हार्दिक चुकला. पाचव्या चेंडूवर हार्दिकने एक धाव घेतली आणि सहाव्या चेंडूवर धाव मिळाली नाही. पहिल्या चेंडूवर षटकार बसलेला असतानाही आवेश खानने यॉर्कर टाकत उत्कृष्ट गोलंदाजी करत हार्दिकला रोखले.

अखेरच्या षटकांमध्ये शार्दुल ठाकूर आणि आवेश खान यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनौने मुंबईला २०४ धावांचे लक्ष्य गाठण्यापासून रोखले. याआधी मिचेल मार्श आणि एडन मारक्रम यांनी लखनौकडून उत्कृष्ट अर्धशतके झळकावली होती तर मधल्या षटकांमध्ये फिरकी गोलंदाज दिग्वेश राठीने मुंबईच्या फलंदाजांवर नियंत्रण ठेवले.
लखनौने या सामन्यात प्रथम फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभारली. पुन्हा एकदा सलामीवीर मिचेल मार्शने संघासाठी स्फोटक खेळी खेळली आणि अवघ्या २७ चेंडूत अर्धशतक झळकावले. मार्शने ३१ चेंडूत ६० धावा केल्या. एडन मारक्रमने अर्धशतक झळकावले. मात्र, निकोलस पूरन अपयशी ठरला, तर कर्णधार पंत सलग चौथ्या सामन्यात फ्लॉप ठरला.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR