लातूर : प्रतिनिधी
प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण याची विचारणा होत आहे. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण यापेक्षा महाराष्ट्राचा स्वाभिमान व महाराष्ट्राला या भ्रष्टाचारी सरकारच्या तावडीतून वाचवणे म्हतवाचे असून आगामी विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूूकीला सामोरे जाणार आहोत, असा सदेश अखिल भारतीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी आयोजित पत्रकार परिषदेतून लातूरहून सर्व राज्याला बोलताना दिला.
पुढे बोलताना नानाभाऊ पटोले यांनी राज्यात रस्ते नाहीत, खड्याचे राज्य बनले आहे, अटल सेतू, समृध्दी महामार्गाला तडे गेले आहेत. यामार्गावर असंख्य नागरिकांचे बळी जात आहेत. विकासाच्या नावाखाली लाखो कोटीच्या कर्जाचा बोजा राज्याच्यावर चढवला गेला आहे. राज्यात शेतक-यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या असून त्या राज्यातील प्रगत कोल्हापूर जिल्ह्यापर्यंत पोहचल्या आहेत. विशेष म्हणजे कृषीमंत्र्यांच्याच जिल्ह्यात जवळपास ८८० शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. केवळ मतासाठी लाडकी बहीण सारख्या योजना सुरु केल्या गेल्या. आणि आम्ही परत सत्तेत नाही आल्यास ही योजना बंद होईल असे उप मुख्यमंत्री अजित पवार उघड बोलतात. राज्यातील सरकार हे ५० टक्के भ्रष्टाचारी सरकार असून सरकार विरोधात राज्यातील जनतेत रोष आहे. राज्यात येणा-या विधानसभा निवडणूकीत महाविकास अघाडीच्या १८५ च्या वर जागा निवडून येतील तर महायुतीला १०० च्या आत जागा मिळतील असा दावा ही नानाभाऊ पटोले यांनी व्यक्त करत जाती धर्मावर नाहीतर जनतेतून ज्यांचें नाव समोर येईल त्यांनाच विधानसभेसाठी उमेदवारी दिली जाईल असे सांगितले.
यावेळी राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी लोकसभा निवडणूकीत पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांशी चर्चा करून उमेदवार दिल्यानेच काँग्रेसला चांगले यश मिळाल्याचे सांगून विधानसभेसाठी ही याच प्रमाणे उमेदवार दिले जाणार असून याची सुरूवात लातूरातून केल्याचे सांगून राज्यातील व केंद्रातील सरकारने सोयाबिन, कापूस उत्पादक शेतक-यांना दिलेला शब्द पाळला नाही. त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. देशात सर्वात जास्त भ्रष्टाचार हा महाराष्ट्रात झाला असून प्रत्येक कामात ५० टक्के कमिशन उकळले जात असल्याचा आरोप ही चेन्नीथला यांनी यावेळी बोलताना केला. या पत्रकार परिषदेचे प्रास्ताविक माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले. त्यांनी यावेळी बोलताना विधानसभा निवडणूक तयारी संदर्भात आढावा बैठकीची मराठवाडा स्तरीय सुरुवात आज शंख नादाने लातूरपासून करण्यात आली. आजच्या या बैठकीत पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या समवेत आजच्या बैठकीत चर्चा झाली.
या चर्चेसाठी उपस्थित कार्यकर्ते यांची संख्या पाहता राज्यात महाविकास आघाडी सरकार पुन्हा हवे आशा अपेक्षा सर्वांनी व्यक्त केल्या असून पक्ष श्रेष्ठींच्या मार्गदर्शन नुसार निवडणुकीत काम करणार असल्याचे उपस्थित सर्वांनी या बैठकीत मत व्यक्त्त केल्याचे सांगितले. यावेळी विधानसभेतील कॉग्रेसचे गट नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडवट्टीवार, माजी मंत्री आमदार सतेज पाटील खा. शिवाजी काळगे, आ. धिरज विलासराव देशमुख यांची उपस्थिती होती.