पुणे : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या तब्येतीची विचारपूस करून त्यांना लवकरात लवकर बरे होऊन जनसेवेत रुजू होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच इथे जवळच सभा होती आणि प्रकाश आंबेडकरांचे नुकतच ऑपरेशन झालं होतं म्हणून भेटायला आलो होतो. याचा कुठलाही राजकीय अर्थ काढू नका, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले आहे.
यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, प्रत्येक भेटीकडं राजकीय दृष्टीनं बघू नका. तसंच राजकीय अर्थ देखील काढू नका. प्रकाश आंबेडकर हे माझे चांगले मित्र असून त्यांची काही दिवसांपूर्वीच अँजीओप्लास्टी झाली. माझी बाजुलाच सभा असल्यामुळे मी त्यांना भेटलो आणि ही भेट आमची सदिच्छा भेट होती. यात राजकीय काहीही नव्हते.
उपमुख्यमंर्त्यांनीही घेतली भेट
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नुकतीच प्रकाश आंबेडकर यांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना अजित पवार म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांची काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली आहे. त्यांच्या तब्येतीबाबत विचारपूस करण्यासाठी आलो होतो.