वाशिम : प्रतिनिधी
देशभरात ६ एप्रिल रोजी श्रीरामनवमीचा उत्साह बघायला मिळत आहे. अशातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवीच्या दर्शनासाठी वाशिमच्या दौ-यावर येणार होते. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या देखील रामनवमी निमित्त पोहरादेवी येथे नतमस्तक होण्यासाठी येणार होत्या. मात्र पोहरादेवी येथील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा हा रद्द करण्यात आला असल्याची माहिती पुढे आली आहे.
भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.
पुढे आलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याने हा दौरा रद्द झाल्याची माहिती पुढे आली आहे. यावेळी मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री संजय राठोड यांनी सपत्निक संत सेवालाल महाराजांचे शासकीय पूजन केले. तर मंत्री इंद्रनील नाईक हे देखील सपत्निक यावेळी उपस्थित होते. पोहरादेवीच्या इतिहासात प्रथम मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांनी अशा पद्धतीने शासकीय पूजन केले आहे.
दरम्यान, यावेळी बोलताना एकनाथ खडसे यांनी केलेल्या आरोपावर गिरीश महाजनांना विचारले असता ते म्हणाले की, आज पोहरादेवी दर्शनासाठी आलो आहे. त्यांना निवांत उत्तर देईन, अशी यावेळी महाजन यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. तर मुख्यमंत्री आज येऊ शकले नसले तरी ऑनलाईन पद्धतीने किंवा फोनद्वारे ते संवाद साधतील. या यात्रेला देश-विदेशातील बंजारा समाजबांधव मोठ्या संख्येने येत असतात आणि संत सेवालाल महाराज आणि जगदंबादेवीच्या चरणी नतमस्तक होत असतात. त्यामुळे सभेला मुख्यमंत्री संबोधित करतील, अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
दरम्यान, पोहरादेवी येथील सभास्थळी मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय राठोड, मंत्री इंद्रनील नाईक, मंत्री मेघना बोर्डीकर यांचे आगमन झाले आहे. तसेच माजी मंत्री संजय कुटे, भाजप आमदार सईताई डहाके, भाजप विधान परिषद आमदार बाबूसिंग महाराज, यांची उपस्थिती ही पाहायला मिळत आहे. पोहरादेवीच्या इतिहासात प्रथमच मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांनी अशा पद्धतीने शासकीय पूजन केले आहे.