18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमुख्य बातम्यामुख्यमंत्री पदासाठी शिंदेसेनेचे मोदींकडे लॉबिंग

मुख्यमंत्री पदासाठी शिंदेसेनेचे मोदींकडे लॉबिंग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
महाराष्ट्र विधानसभा निवडणुका पार पाडल्यानंतर आता राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे. मंत्रिपदाची माळ गळ्यात पडावी यासाठी लॉबिंग सुरू आहे. दुसरीकडे राज्याचे नेतृत्व कोण करणार यावरून आता खल सुरू झाला आहे.

राष्ट्रवादीने या पेचात न पडण्याचे अगोदरच धोरण ठरवले असले तरी एकनाथ शिंदे यांची शिवसेना हा सामना सहजासहजी हातचा जाऊ देऊ इच्छित नसल्याचे पडद्यामागील घडामोडींवरून समोर येत आहे. मुख्यमंत्री पदासाठी एक फॉर्म्युला असावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे शिंदेसेनेने आता पंतप्रधान मोदींकडे लॉबिंग सुरू केले आहे. एकनाथ शिंदे गटाचे ७ खासदार आणि ४ माजी खासदार पंतप्रधानांची भेट घेणार असल्याचे समोर येत आहे.

महाराष्ट्रातील राजकीय पेचातून वाटाघाटी करून मार्ग काढला जाईल, अशी माहिती भाजपमधील वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे. त्यामुळे वाटाघाटी पूर्ण केल्यानंतरच भाजपचा गटनेता निवडला जाणार आहे. त्यानंतरच निरिक्षक महाराष्ट्रात पाठवला जाणार असल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली.

एकनाथ शिंदे यांच्या खासदारांनी पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी वेळ मागितला आहे. शिवसेनेचे माजी खासदारही दिल्लीत उपस्थित राहणार आहेत. त्यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे भेटीसाठी वेळ मागितल्याचे समोर येत आहे.

शिवसेनेच्या नेत्यांना मुख्यमंत्री पदाची अपेक्षा लागली आहे. तर भाजपला १३० पेक्षा अधिक जागा मिळाल्याने मुख्यमंत्री हा भाजपचाच व्हावा, अशी भाजपच्या नेत्यांची अपेक्षा आहे. त्यामुळं दोन्ही पक्षांच्या नेत्यांना समजावून सांगून सामोपचारानं मार्ग काढण्याचा भाजप श्रेष्ठींचा प्रयत्न आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR