लातूर : प्रतिनिधी
सत्तेत येण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य कौशल्य विकास प्रशिक्षण योजना जाहीर करणे आणि पुन्हा सत्तेत आल्यानंतर ही योजना संपुष्टात आणण्याचा निर्णय घेणे म्हणजे राज्यातील लाखो बेरोजगार युवकांची चेष्टा करण्यासारखे आहे. त्यांच्या भविष्याशी, त्यांच्या स्वप्नांशी खेळण्याचाच हा प्रकार होईल. त्यामुळे तात्काळ मुख्यमंत्री युवा कार्य कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी लातूर ग्रामीणचे माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य कौशल्य विकास प्रशिक्षण योजना संपुष्टात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचे पत्र संबंधित विभागाकडून जाहीर झाले आहे. एकाच वेळी राज्यातील लाखो तरुण पुन्हा बेरोजगार होणार असल्याने तरुणांमध्ये नाराजी पसरली आहे. याची दखल घेऊन लातूर ग्रामीणचे माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे योजनेला मुदतवाढ मिळण्याची मागणी केली आहे.
माजी आमदार धिरज विलासराव देशमुख म्हणाले विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री युवा कार्य कौशल्य विकास प्रशिक्षण योजना संपुष्टात येत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. राज्यातील लाखो बेरोजगार युवकांना या योजनेच्या माध्यमातून गाजर दाखवून त्यांची मते महायुती सरकारने घेतली. पुन्हा सत्तेत आल्यानंतर ही योजना संपुष्टात आणण्याचा निर्णय घेणे म्हणजे बेरोजगार युवकांची चेष्टा करण्यासारखे आहे.
अनेक नियुक्त बेरोजगार युवकांना प्रतिमहा दहा हजार रुपयांचे मानधनही सरकारने अद्याप दिलेले नाही. सरकार जनतेची कशाप्रकारे फसवणूक करत आहे, हे दिसत आहे. सरकारने संबंधित बेरोजगार युवकांना थकीत मानधन तातडीने द्यावे, ही योजना संपुष्टात न आणता या योजनेला मुदतवाढ देऊन युवकांच्या हाताला काम द्यावे.