35.1 C
Latur
Tuesday, April 15, 2025
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांची अजित पवारांच्या खात्यात घुसखोरी

मुख्यमंत्र्यांची अजित पवारांच्या खात्यात घुसखोरी

रोहित पवारांची पोस्ट चर्चेत

पुणे : प्रतिनिधी
मुख्यमंत्र्यांनी ‘मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार’ हे राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेले पद निर्माण करून एकप्रकारे अजितदादांच्या अर्थखात्यात देखील घुसखोरी केली असल्याची पोस्ट राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

दरम्यान, मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त आणि ‘मित्रा’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांची मुख्यमंत्री कार्यालयात ‘मुख्य आर्थिक सल्लागार’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरु असून अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

रोहित पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी ‘मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार’ हे राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेले पद निर्माण करून एकप्रकारे अजितदादांच्या अर्थखात्यात देखील घुसखोरी केलेली आहे. यापुढे अर्थ खात्याचे सर्वच धोरणात्मक निर्णय आणि पर्यायाने सर्वच प्रशासकीय निर्णय सुद्धा मुख्य आर्थिक सल्लागारांच्या पर्यायाने मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येतील. गेल्या अडीच वर्षात घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेत आधी एकनाथ शिंदेच्या खात्यांमध्ये घुसखोरी केली, आता अजित पवारांचा नंबर आहे, असे रोहित पवार म्हणाले.

पुढे म्हणाले, विद्यमान मुख्यमंत्र्यांचा नेहमीच एकाधिकारशाहीकडे कल राहिला असल्याने त्यांनी प्रत्येक मंत्रालय प्रत्यक्ष-अपत्यक्षपणे आपल्या नियंत्रणात ठेवण्यावर भर दिला आहे. मुख्य आर्थिक सल्लागार नेमण्याचा निर्णय देखील त्याच कार्यपद्तीचा भाग आहे.
लोकशाहीत सत्तेचे विकेंद्रीकरण आणि टीम वर्कचा रिझल्ट नेहमीच केंद्रीकृत सत्तेपेक्षा चांगला राहिला आहे, त्यामुळे मुख्यमंर्त्यांनी आपल्या कार्यपद्धतीत बदल करणे महाराष्ट्राच्या हिताचे राहील, असा टोलाही रोहित पवारांनी लगावला.

प्रवीण परदेशी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील अधिकारी म्हणून ओळखले जातात. २०१४ मध्ये मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी परदेशी यांची मुख्यमंत्र्यांच अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर त्यांची बदली मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून करण्यात आली होती. मात्र, कोरोना काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची तडकाफडकी उचलबांगडी केली होती. त्यामुळे नाराज झालेल्या परदेशी यांनी संयुक्त राष्ट्रात प्रतिनियुक्तीवर जाणे पसंत केले होते.

रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला
विद्यमान मुख्यमंत्र्यांचा नेहमीच एकाधिकारशाहीकडे कल राहिला असल्याने त्यांनी प्रत्येक मंत्रालय प्रत्यक्ष-अपत्यक्षपणे आपल्या नियंत्रणात ठेवण्यावर भर दिला आहे. आता, मुख्य आर्थिक सल्लागार नेमण्याचा निर्णय देखील त्याच कार्यपद्धतीचा भाग आहे. लोकशाहीत सत्तेचे विकेंद्रीकरण आणि टीम वर्कचा रिझल्ट नेहमीच केंद्रीकृत सत्तेपेक्षा चांगला राहिला आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपल्या कार्यपद्धतीत बदल करणे महाराष्ट्राच्या हिताचे राहील, असा सल्लादेखील रोहित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिला आहे.

भाजपासाठी मित्रपक्ष म्हणजे तात्पुरती सोय
दरम्यान, राहिला प्रश्न मित्रपक्षांचा, तर भाजपच्या शब्दकोशात मित्रपक्ष म्हणजे केवळ ‘तात्पुरती सोय’ एवढाच अर्थ आहे, त्यामुळे गरज संपताच तात्पुरती सोय देखील संपवायची ही भाजपची कार्यपद्धती आहे. भाजपची ही कूटनीती बाहेर राहून सर्वांना कळत असली तरी शिकार होणा-या मित्रपक्षांना शिकार होईपर्यंत कळत नाही हे मात्र मित्रपक्षांचं दुर्दैव म्हणावं लागेल, असेही रोहित पवार यांनी म्हटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR