31.4 C
Latur
Saturday, March 29, 2025
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची वर्तणूक संविधानविरोधी

मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची वर्तणूक संविधानविरोधी

सरकार बरखास्त करा, काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात कायदा सुव्यवस्था राखणे ही सरकारची संविधानिक जबाबदारी असते. परंतु दुर्देवाने महायुती सरकार जाणिवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करण्याकरिता धर्मांधतेचे विष पसरवत आहे. भाजपाच्या परिवारातील संस्था औरंगजेबाच्या कबरी विरोधात आंदोलन करतात आणि मंत्री व मुख्यमंत्री वक्तव्ये करतात. राज्यातील आजची परिस्थिती पाहता राज्य सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात पूर्णपणे अपयशी ठरले असून मुख्यमंत्री आणि मंत्री यांची वर्तणूक संविधानविरोधी आहे. त्यामुळे हे राज्य सरकार तात्काळ बरखास्त करण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली.

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन नागपूर हिंसाचारासह राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर निवेदन दिले. या शिष्टमंडळात विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी प्रांताध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, आदी नेते उपस्थित होते. या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, राज्याचे मत्स्यपालन व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी राजकीय फायद्यासाठी दोन धर्मात तेढ निर्माण व्हावे या उद्देशाने सातत्याने वादग्रस्त विधाने करत आहेत. असे असतानाही मुख्यमंत्र्यांनी त्यांना पाठीशी घालण्याचे काम केले आहे याचाच अर्थ राज्यातले सामाजिक सौहार्द आणि शांतता बिघडावी हे राज्य सरकारचे धोरण आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि नितेश राणेसारख्या मंत्र्यांना संविधानाच्या आधारे मंत्रीपदाची शपथ दिलेली आहे. राज्य संविधानाच्या आधारे चालावे याची संविधानाचे संरक्षक म्हणून आपली जबाबदारी आहे. त्यामुळे आपण राणेंसारख्या मंत्र्यांची तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी शिष्टमंडळाने केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR