38.3 C
Latur
Monday, April 7, 2025
Homeमहाराष्ट्रमुनावळे जल पर्यटन प्रकल्पाचे काम थांबविले

मुनावळे जल पर्यटन प्रकल्पाचे काम थांबविले

मुंबई : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ड्रीम प्रोजेक्टचे काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सातारा जिल्ह्यातील मुनावळे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जल पर्यटन प्रकल्पाचे काम सुरू होते. मात्र, हे काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सुशांत मोरे यांनी याबाबत आंदोलन केले होते. परवानगी मिळाली नसल्याने मुनावळे येथील उपमुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टचे काम सुरू करता येणार नाही असे लेखी आदेश मुख्य वनरक्षक महाराष्ट्र राज्य यांनी दिले आहेत.

दरम्यान, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा गाजावाजा करीत दोन वर्षांपूर्वी सातारा जिल्ह्यातील मुनावळे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जल पर्यटन प्रकल्पाची निर्मिती करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर ८ मार्च २०२४ रोजी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुनावळे येथील जलपर्यटन प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते. ग्रामीण भागात पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य सरकारकडून मुनावळे येथे हा प्रकल्प विकसित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. मात्र, आता हे काम थांबवण्याचे लेखी आदेश मुख्य वनरक्षक महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात आले आहेत.

केंद्रीय वन पर्यावरण मंत्रालयाने मुनावळे हे ठिकाण माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पर्यावरण व जैवविविधतेच्या संरक्षणासाठी इकोसिन्सिव्ह झोन म्हणून जाहीर केला आहे. या ठिकाणी कोणतेही पर्यटन प्रकल्प राबवताना वन पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालय भारत सरकार, केंद्रीय वन्यजीव मंडळ, राज्य वन्यजीव मंडळ, स्थानिक सल्लागार समिती सह्याद्री व्याघ्र राखीव, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, कोयना जलसंपदा विभाग, स्थानिक ग्रामपंचायत या प्राधिकरणांच्या १६ ना-हरकत परवानग्या मिळवणे गरजेचे असताना सद्य:स्थितीत कोणत्याही विभागाची परवानगी मिळाली नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे न हरकत प्रमाणपत्र प्राप्त होणे गरजेचे होते.

या सर्व विभागाच्या परवानग्या प्राप्त झाल्याशिवाय पर्यटन प्रकल्पातील कामे सुरू करू नयेत, असे लेखी आदेश मुख्य वनरक्षक महाराष्ट्र राज्य यांनी दिले आहेत. यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोयना धरणातील शिवसागर जलाशयात मुनावळे येथे जलपर्यटन प्रकल्प तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुरू करण्यात आला होता. गोड्या पाण्यातील हा देशातला पहिलाच जल पर्यटन प्रकल्प आहे. याच्या उद्घाटनावेळी एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पामुळे स्थानिकांना फायदा होईल असे स्पष्ट केले होते.

स्थानिक लोकांच्या रोजगाराचा प्रश्न
या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होणार होता. त्यामुळे या भागातून कामासाठी शहराकडे स्थलांतरित झालेले नागरिक या प्रकल्पामुळे परत येईल, असे सांगितले जात होते. त्यासोबतच महाबळेश्वरमध्ये येणा-या पर्यटकांना आता याचा दुहेरी लाभ होईल, असेही एकनाथ शिंदे म्हणाले होते. त्यामुळे आता या प्रकल्पाचे काम थांबविण्यास सांगितले असल्याने सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR