लातूर : प्रतिनिधी
लातूर तालुक्यातील मुरुड येथील ग्रामीण रुग्णालयातील छताच्या प्लास्टरसह छताचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. खाटेवर रुग्ण नसल्यामुळे जीवितहानी झाली नाही. ही इमारत धोकादायक झालेली असतानाही येथे उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम केले जात नाही. यात अक्षम्य दिरंगाई होत असल्याने लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी लक्ष घालून तातडीने उपजिल्हा रुग्णालयाचे काम सुरु करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी लातूर ग्रामीणचे माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केली.
माझ्या सततच्या पाठपुराव्यामुळे सन २०२३ मध्ये मुरुड येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर करण्यासह २५.४७ कोटी रुपयांच्या कामास शासनाने मंजुरी प्रदान केली. सन २०२४ मध्ये या कामाची निविदा स्विकृत करुन कार्यारंभ आदेश देण्यात आला, परंतु नवीन इमारतीच्या बांधकामाची अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे रुग्ण व डॉक्टरांची प्रचंड गैरसोय होत आहे.
शासनाच्या अक्षम्य दिरंगाईमुळे सध्या मोडकळीस आलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीमध्ये डॉक्टर व आरोग्य कर्मचा-यांना आपला जीव मुठीत घेऊन रुग्नसेवा करावी लागते आहे. रुग्णांनाही जीव धोक्यात घालून येथे उपचारासाठी यावे लागत आहे. याची गंभीर दखल घेऊन लातूरचे पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी तातडीने हे काम सुरु करण्याचे निर्देश द्यावेत, अशी माझी मागणी आहे असे लातूर ग्रामीणचे माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी सांगितले.