मुंबई : प्रतिनिधी
राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात करुणा मुंडे यांनी आवाज उठवला आहे. ‘मुलं तुमची आहे म्हणता मग करुणा मुंडे तुमच्या पत्नी कशा नाहीत’ असा सवा ल कोर्टाने उपस्थित करत धनंजय मुंडे यांची पुरतीच गोची केली आहे.
दरम्यान वांद्रे कोर्टात झालेल्या सुनावणीत कोर्टाने धनंजय मुंडे यांना करुणा मुंडे यांना दर महिना २ लाखांची पोटगी देण्याचे निर्देश दिले होते. याविरोधात धनंजय मुंडे यांनी वरच्या कोर्टात आव्हान दिले होते. त्यावर आज सुनावणी पार पडली. दरम्यान या सुनावणीमध्ये नेमके काय घडले हे जाणून घेऊया. धनंजय मुंडे यांनी वांद्रे कोर्टाच्या निर्णयाला वरच्या कोर्टात आव्हान दिले होते. त्या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. यावेळी करुणा शर्मा यांच्यासोबत अधिकृत लग्न झालेले नाही असा युक्तिवाद मुंडे यांच्या वकिलांनी कोर्टात केला. धनंजय मुंडे यांनी मुलांना स्वीकारले आहे, पण त्यांच्या आईशी लग्न केलेले नाही असा युक्तिवाद करण्यात आला.
तसेच करुणा मुंडे यांचे वार्षिक उत्पन्न हे जवळपास १५ लाखांच्या आसपास आहे. त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. तरी देखील त्यांनी पोटगीसाठी अर्ज केला आहे, असा युक्तिवाद वकिलांनी केला. दरम्यान, मुलं तुमची आहेत म्हणता मग करुणा मुंडे तुमच्या पत्नी कशा नाहीत, असा सवाल कोर्टाने उपस्थित केला.
दरम्यान करुणा मुंडे यांच्या वकिलांनी देखील कोर्टात युक्तिवाद केला. यावेळी धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांचे लग्न झाले आहे. त्यांचे एकत्रित फोटो देखील आहेत, असे वकिलांनी सांगितले. त्यावर करुणा शर्मा यांचे धनंजय मुंडे यांच्याशी लग्न झाले आहे याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे असा सवाल कोर्टाने विचारला. त्यावर पुरावे सादर करण्यासाठी आम्हाला वेळ हवा आहे असे करुणा मुंडे यांच्या वकिलांनी सांगितले. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ५ एप्रिलला होण्याची शक्यता आहे.
करुणा मुंडेंना दरमहा एवढी पोटगी
करुणा मुंडे यांनी दरमहा १५ लाख रुपये पोटगी देण्याची मागणी केली होती. मात्र कोर्टाने दिलासा दिल्यानंतर करुणा मुंडे यांना दरमहा २ लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश कोर्टाने मंत्री धनंजय मुंडे यांना दिले आहेत. वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे. कोर्टाने धनंजय मुंडे यांना मोठा धक्का दिला असून यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.