धाराशिव : प्रतिनिधी
मुलगा होत नसल्याच्या कारणावरुन पतीकडून पत्नीचा गळा दाबून कोयत्याने वार करुन खून केला. ही खळबळजनक घटना तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथे गुरुवारी (दि.१९) दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथील आरोपी धनंजय भारत माळी यांने गुरुवारी (दि.१९)दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास काटगाव येथे पत्नी गोजर धनंजय माळी (वय २८) रा. काटगाव ता. तुळजापूर यांना तुला मुलगा होत नाही, या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली.
तसेच गळा दाबून कोयत्याने गळ्यावर वार केले. यामध्ये त्या गंभीर जखमी होवून मयत झाल्या. अशी फिर्याद मयताची बहिण शिलाबाई हरिदास माळी (वय ४१) रा. काटगाव ता. तुळजापूर यांनी शुक्रवारी (दि.२०) नळदुर्ग पोलीस ठाणे येथे दिल्याने आरोपी पतीवर भा.न्या.सं. कलम १०३ (१) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.