लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील निलंगा-औराद शहाजनी या मुख्य रस्त्यावर भर उन्हात एक महिला तिच्या लहान मुलीसोबत दररोज दिवस मावळेपर्यंत बसून राहायची. कुणी विचारपूस करायला गेले तरी ती कुणालाही जवळ येऊ द्यायची नाही. गेल्या कित्येक दिवसांपासून त्या महिलेचा हा दिनक्रम ठरलेला होता. मुलाच्या विरहाने मनोरुग्ण झालेल्या त्या ‘आई’ची लातूरच्या युवकांनी केलेल्या निस्वार्थ सेवेमुळे सुटका झाली. त्या आईला पुढील उपचारासाठी बुलढाणा येथे रवाना करण्यात आले. औराद येथील काही पत्रकार आणि समाजसेवी व्यक्तींनी तिची माहिती घेतली असता हृदय पिळवटून टाकणारी करुण कहाणी समोर आली. त्या महिलेला २ मुली आणि २ मुले होती.
तिच्या पतीचेही काही वर्षांपूर्वी निधन झालेले आहे. तिचा लहान मुलगा पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेला असता त्याचा त्या विहिरीत पडून मृत्यू झाला तेंव्हापासून ती आई मुलाच्या विरहाने मनोरुग्ण झाल्याचे समजले. मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या त्या विहिरीजवळ ती दररोज आपल्या चिमुकल्या मुलीला घेऊन सकाळी ९ च्या दरम्यान यायची आणि दिवस मावळला की घरी निघून जायची. रस्त्यावर दररोज ये-जा करणा-या लोकांना या महीलेचा कळवळा यायचा काही मदतकिंवा संवाद साधण्यासाठी जवळ जाण्याचा प्रयत्न केला की ती आक्रमक व्हायची.
माझं लातूर परिवाराचे औराद शहाजनी येथील ज्येष्ठ पत्रकार दिपक थेटे यांनी मला दूरध्वनीवर संपर्क साधून या महिलेची माहिती दिली. क्षणाचाही विलंब न करता मी लातूर येथील राहुल पाटील यांना या मनोरुग्ण आईची सुटका करावी अशी विनंती केली. जिल्हातील शेकडो मनोरुग्ण व्यक्त्तींचे पुनर्वसन करुन त्यांना ख-या अर्थाने जीवन जगण्यास मदत करणा-या या तरुणांचे काम अविश्वसनीय आणि प्रशंसनीय आहे.
राहूल पाटील, सय्यद मुस्तफा, आकाश गायकवाड, असिफ पठाण, गोपाळ ओझा आणि फय्याज यांनी काल घटनास्थळी जाऊन या मनोरुग्ण आईला ताब्यात घेतले असून पुढील उपचारासाठी तिला बुलढाणा जिल्ह्यातील गोंदनखेड- वरवंड येथे असलेल्या दिव्य सेवा प्रकल्प येथे उपचारासाठी पाठविले आहे. लवकरच या आई पूर्णपणे ब-या होऊन आपल्या गावी परततील, असा विश्वास या तरुणांनी व्यक्त्त केला आहे.