नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कर्नाटक राज्य सरकारने सरकारी कंत्राटांमध्ये मुस्लिमांना ४ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला, त्यावरून आज संसदेत प्रचंड गोंधळ झाला. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू होताच, कर्नाटकातील मुस्लिम आरक्षणावरून ट्रेझरी बेंचच्या सदस्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज पहिल्यांदा दुपारी १२ वा. पर्यंत, नंतर दुपारी २ पर्यंत आणि राज्यसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
काँग्रेस मुस्लिम आरक्षणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेले संविधान का बदलत आहे? याचे उत्तर द्यावे, असे संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले. यावर उत्तर देताना काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, देशाचे संविधान बाबासाहेबांनी बनवले. त्याला कोणीही बदलू शकत नाही. ते सुरक्षित राहावे यासाठी आम्ही कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत भारत जोडो यात्रा काढली. आपण संविधान बदलणार आहोत असे कोणी म्हटले?
यावर किरण रिजिजू म्हणाले की, बाबासाहेबांनी नाकारलेले मुस्लिम लीगचे धोरण राबवून काँग्रेस पक्षाने बाबासाहेबांची प्रतिष्ठा कलंकित केली आहे. किरण रिजिजू यांनी कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात केलेले विधान वाचून दाखवले आणि काँग्रेस अध्यक्षांना कारवाई करण्याचे आव्हान दिले. गदारोळानंतर अध्यक्षांनी १२ वाजेपर्यंत सभागृह तहकूब केले. कामकाज पुन्हा सुरू होताच किरेन रिजिजू यांनी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. यावर झालेल्या गोंधळानंतर पुन्हा लोकसभा दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली.