21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रमुस्लिम मतांभोवती विजयाचे गणित

मुस्लिम मतांभोवती विजयाचे गणित

छ. संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील तिहेरी लढ्यातील बहुरंगी प्रचारात विजयाचे सूत्र जातीच्या समीकरणात दडले आहे. या निवडणुकीमध्ये प्रचारात ‘खान की बाण’ नव्हता. नव्या प्रारूपात शिवसेनेने बदललेल्या भूमिकेमुळे मुस्लिम मतांमध्ये फूट पडेल का, या प्रश्नाभोवती उमेदवारांच्या विजयाचे अंदाज बांधले जात आहेत. मतदान झाल्यानंतर फटाके फोडून आणि ढोल वाजवून विजयापूर्वीच एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. पण निकालापूर्वीचा हा जल्लोष कदाचित चूक ठरेल, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. जात आणि धर्म या मुद्यांभोवती रंगलेल्या निवडणुकीत विजयी उमेदवार आणि पराभूत उमेदवार यांच्यातील मतांचे अंतर फार तर दहा हजार असेल, असे सांगण्यात येत आहे.

काहीशा उशिराने महायुतीचे उमेदवार म्हणून संदिपान भुमरे यांची उमेदवारी जाहीर झाली. संजय शिरसाठ, प्रदीप जैस्वाल, रमेश बोरनारे या शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांबरोबर भाजपचे प्रशांत बंब, अतुल सावे यांनी महायुतीच्या उमेदवाराला मते मिळावीत म्हणून केलेले प्रयत्न फलदायी ठरले आहेत का, यावर संदिपान भुमरे यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. ग्रामीण भागात जातीय अंगाने प्रचार झाला असला तरी शहरातील काही भागात मोदींना प्रधानमंत्री करण्यासाठी मतदान झाले. भुमरे यांची ‘मद्य विक्रेता’ अशा उद्धव ठाकरे गटाने केलेल्या प्रतिमेचा शहरी मतदारांवर फारसा परिणाम झाला का हे निकालानंतर स्पष्ट होईल. मात्र, ग्रामीण भागात भुमरे यांच्या प्रतिमेचा परिणाम झाल्याची चर्चा सुरू आहे. ‘खान की बाण’प्रचारातून गायब होते, तसेच राजकीय पटलावर ‘मराठा’ ‘ओबीसी’ हा प्रचारही नव्हता.

पण मतदानाचे निकष मात्र त्याच अंगाने फिरविण्यात उमेदवारांना यश आले. मराठवाड्यातील अन्य मतदारसंघात दलित आणि मुस्लिम मतदारांनी मोदींविरोधात मत करायचे हे ठरवले होते. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मुस्लिमांचा रोख ‘एमआयएम’पासून दूर होण्याचा नव्हता, असेच सांगण्यात येत आहे. पण या वेळी एमआयएम पक्षाला दलितांचे सरसकट मतदान मिळाले नाही. त्यामुळे निवडणुकीतला विजयाचा फॅक्टर त्रिकोणी असू शकेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR