मुंबई : प्रतिनिधी
नागपुरातील दंगलखोरांना सोडणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात. तसे ‘फेकाड्या’ लोकांनाही सोडू नका. महाराष्ट्राचे समाजजीवन खतम करण्याचे काम या लोकांनी चालवले आहे. औरंगजेब, सुशांतसिंह राजपूत, दिशा सालियन या मृतांचा बाजार भरवून राजकारण करण्याचा षंढपणा वाढला आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
दरम्यान, सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात संशयास्पद असे काहीच आढळले नसल्याचे सीबीआयने त्यांच्या अहवालात म्हटले आणि रिया चक्रवर्तीला क्लीन चिट दिली, पण मग रिया चक्रवर्तीला आरोपीच्या पिंज-यात ढकलून जी बदनामी केली गेली, तुरुंगवास भोगायला लावला त्याची भरपाई कोणी करायची? अशी खरमरीत टीका ठाकरेंनी सरकारवर केली आहे.
खोटे नॅरेटिव्ह निर्माण करायचे आणि लोकांत गोंधळ उडवायचा हे भाजपा आणि त्यांच्या लोकांचे धोरण आहे. पाच वर्षांपूर्वी सुशांतसिंह राजपूत या अभिनेत्याने आत्महत्या केली. या आत्महत्येस ‘हत्या’, ‘खून’ वगैरे ठरवून भाजपावाल्यांनीच मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रयत्न केला.
दंगली घडवण्याची पूर्वतयारी
नागपूरचा हिंसाचार ही महाराष्ट्रात मोठ्या दंगली घडवण्याची पूर्वतयारी आहे. लोकांची माथी भडकवणे आणि हिंसाचार करणे शक्य आहे, याची राजकीय चाचपणी नागपुरात झाली. दंगलीचे रॉकेट यशस्वीपणे उडाल्यावर मुख्यमंत्री म्हणतात, दंगलखोरांना सोडणार नाही, मात्र जे दंगलखोर मंत्रिमंडळात बसून मुख्यमंत्र्यांचा आम्हाला पाठिंबा आहे. आम्ही हवा तसा धुडगूस घालू, आगी लावू, आमचे कोण काय वाकडे करणार? असे उघडपणे बोलतात त्यांचे काय? त्यांच्याकडे मुख्यमंत्री दुर्लक्ष करतात.