सोलापूर : मृत पोलिस कर्मचाऱ्याच्या वारसास अपघातात नुकसान भरपाई म्हणून महालोकअदालतीमध्ये ७० लाख रुपये विमा कंपनीकडून तडजोडीमध्ये मंजूर करण्यात आले. महा लोकअदालतीमध्ये मृत पोलीस कर्मचारी संजय अरुण खटके यांच्या वारस पत्नी उषा खटके, मुलगा सूरज खटके, निरंजन खटके व वडील अरुण खटके यांना इफको टोकिओ जनरल इन्शुरन्स कंपनीने अपघात नुकसान भरपाई म्हणून ७० लाख रुपयांस तडजोड केली.
पोलीस कर्मचारी संजय खटके हे ग्रामीण पोलीस दलात वाहतूक शाखेत नोकरीस होते.
१५ जानेवारी २०१६ रोजी मोहोळ कामती रोडवर नजीकपिंपरीजवळ नोकरीवर असताना दहाचाकी ट्रकने त्यांना धडक दिली होती. त्यावेळी ते जागीच ठार झाले होते. त्यानंतर त्यांच्या वारस पत्नी, दोन मुले व आई, वडील यांनी ३९ लाख ४४ हजार ७६० रुपये नुकसान भरपाई मिळावी म्हणून दावा दाखल केला होता.
यामध्ये विमा कंपनीने तडजोडीचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार विमा कंपनी व मृत वारस यांच्यामध्ये चर्चे अंती ७० लाख रुपयांस तडजोड ठरली. त्याप्रमाणे झालेल्या महा लोकअदालतीमध्ये तडजोड होऊन विमा कंपनीने ७० लाख रुपयांस तडजोड केली.
यावेळी पॅनलप्रमुख म्हणून जिल्हा न्यायाधीश वाय.ए. राणे, पॅनल सदस्य अॅड. एल. एन. मारडकर हे होते. अर्जदारातर्फे अॅड. विद्यावंत पांढरे यांनी व विमा कंपनीतर्फे अॅड. जी. एच. कुलकर्णी यांनी काम पाहिले.