लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हयातील मेंढीपालन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी राजे यशवंतराव होळकर महामेष योजना राबविली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना मेंढी गट खरेदीसाठी शासनाकडून ७५ टक्के अनुदान मिळण्याच्या बरोबरच मेंढी पालनाच्या पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठीही अनुदानाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे पारंपारिक पद्धतीने मेंढी, शेळीपालनाचा व्यवसाय करणा-या कुटुंबांना याचा फायदा होणार आहे.
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना धनगर व तत्सम (भज- क) जमातीसाठी राबविली जात आहे. पारंपारिक पद्धतीने मेंढी, शेळीपालनाचा व्यवसाय करणा-या कुटुंबांसाठी ही योजना बळ देणारी आहे. या योजनेतून मेंढयासाठी चराई अनुदान, मेंढी-शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान, कुक्कुट पक्षांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान दिले जाणार आहे. यासाठी दि. १२ ते २६ सप्टेंबर या कालावधीत ऑनलाईन अर्ज (भज- क) लाभार्थ्यांना करावे लागणार आहेत.
यशवंतराव होळकर महामेष योजनेमध्ये स्थायी आणि स्थलांतरित पद्धतीने मेंढीपालनासाठी पायाभूत सोई-सुविधेसह २० मेंढया + १ मेंढानर अशा मेंढीगटाचे ७५ टक्के अनुदानावर वाटप, सुधारित प्रजार्तीच्या नर मेंढयांचे ७५ टक्के अनुदानावर वाटप, मेंढी पालनासाठी पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ७५ टक्के अनुदान दिले जाणार आहे. मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी ७५ टक्के अनुदान मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दि. २६ सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज लाभार्थ्यांना करावे लागणार आहेत. लातूर जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने जोरदार तयारी सुरू केली आहे.