28.7 C
Latur
Saturday, April 12, 2025
Homeउद्योगमेटा आणि झुकेरबर्गची चीनशी गुप्त भागीदारी?

मेटा आणि झुकेरबर्गची चीनशी गुप्त भागीदारी?

गद्दारी । ‘मेटा’च्या माजी अधिका-याचा गौप्यस्फोट; चीनमधून १८ अब्ज डॉलर्सचा मिळवला बिझनेस; अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेचे वारंवार उल्लंघन

 

सॅन्फ्रान्सिस्को : वृत्तसंस्था
जगातील सर्वात मोठ्या सोशल मीडिया कंपनीपैकी एक असलेली मेटा कंपनी आणि तिचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांची चीनशी गुप्त भागीदारी असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

‘मेटा’ने चीन सरकारसोबत थेट सहकार्य करत सेन्सॉरशिप टूल्स विकसित करून सेन्सॉरशिप साधण्यास मदत केली असून, यामुळे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे, असे आरोपात म्हटले आहे.

मेटाच्या माजी वरिष्ठ कार्यकारी अधिकारी सारा वाईन-विल्यम्स यांनी केलेल्या या आरोपांमुळे अमेरिका-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी खळबळ माजली असून त्यामुळे झुकेरबर्ग देशभक्त आहे की गद्दार? अशी चर्चा सुरू झाली आहे.

सारा वाईन-विल्यम्स यांनी अमेरिकन सिनेटमध्ये, सिनेटर जोश हॉली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुनावणीमध्ये आपले म्हणणे मांडले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, मी मेटाच्या वरिष्ठ अधिका-यांना अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेचे वारंवार उल्लंघन करताना आणि अमेरिकन मूल्यांशी गद्दारी करताना पाहिले आहे.

मेटाचे वरिष्ठ अधिकारी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला वारंवार गालबोट लावायचे. त्यांनी अमेरिकन युजर्सचा डेटा चिनी कम्युनिस्ट पक्षाला सहजपणे उपलब्ध करून दिला, तसेच चीनला ऑनलाइन सेन्सॉरशिपसाठी मदत करणारी एआय टूल्स तयार करण्यात हातभार लावला. ऑनलाईन माध्यमांवरील नियंत्रणासाठी ते वापरले गेले. मेटाने विकसित केलेले एलएलएएमए हे एआय मॉडेल चिनी एआय कंपनी ‘डीपसीक’ला सहाय्य करण्यासाठी वापरले गेले, असा आरोपही त्यांनी केला.

झुकेरबर्गचा मुखवटा देशभक्तीचा
सारा वाईन-विल्यम्स म्हणाल्या की, मार्क झुकरबर्गने सर्वात मोठी फसवणूक अशी केली की, त्याने स्वत:ला देशभक्त म्हणवून घेतले. स्वत:भोवती अमेरिकेचा झेंडा गुंडाळला आणि असा दावा केला की, चीनमध्ये सेवा दिली जात नाही. प्रत्यक्षात मात्र त्याने मागील दशकभरात चीनमध्ये तब्बल १८ अब्ज डॉलर्सचा व्यवसाय उभा केला. वाईन-विल्यम्स यांनी हेही उघड केले की, कंपनीविरोधात बोलल्यामुळे मेटाने त्यांना तब्बल ५०,००० डॉलर्सचा दंड ठोठावण्याची धमकी दिली होती.

‘मेटा’कडून आरोपांचे खंडन
मेटा कंपनीने मात्र या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. कंपनीने म्हटले आहे की, कंपनी सध्या चीनमध्ये कोणतीही सेवा देत नाही. झुकेरबर्ग यांनी पूर्वी चीनमध्ये सेवा देण्याविषयी आपली उघड इच्छा व्यक्त केली होती, पण प्रत्यक्षात कोणतेही ऑपरेशन्स सुरू करण्यात आलेले नाहीत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR