अमरावती : प्रतिनिधी
अमरावती मेळघाटातील चिखलदरा आणि धारणी तालुक्यात नोव्हेंबर २०२४ मध्ये १० हजार कुपोषित बालके आढळून आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून काँग्रेसच्या नेत्या व राज्याच्या माजी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांना धारेवर धरत सरकारने यावर काय उपाययोजना केल्या? असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केला आहे.
माहिती अधिकारातून मेळघाटातील चिखलदरा आणि धारणी तालुक्यात नोव्हेंबर २०२४ मध्ये १० हजार कुपोषित बालके आढळल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अमरावती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर २०२४ या महिन्यात धारणी तालुक्यात शून्य ते ५ वर्षे वयोगटातील एकूण २० हजार ३८० बालकांपैकी १४ हजार १२६ सर्वसाधारण वजन व उंचीची होती.
४ हजार ९६४ बालके कमी वजनाची तर १ हजार २९० बालके तीव्र कमी वजनाची अशी एकूण ६ हजार २५४ बालके कुपोषित होती. चिखलदरा तालुक्यातील १३ हजार ९६४ बालकांपैकी ९ हजार ८६० बालके सर्वसाधारण वजन व उंचीची तर ३ हजार ३१६ बालके कमी वजनाची, ७८८ बालके तीव्र कमी वजनाची अशी एकूण ४ हजार १०४ बालके कुपोषित होती.
कुपोषणाच्या प्रश्नाबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने यावर उपाययोजना केल्या असल्याचे स्पष्ट केले आहे, यावर यशोमतीताई यांनी सवाल उपस्थित करत राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री आबिटकर यांना नेमक्या काय उपाययोजना केल्या? असा सवाल केला आहे.
मेळघाटमधील बालकांच्या कुपोषणाचा प्रश्न अतिशय गंभीर असून ही अतिशय चिंतेची बाब असल्याचे देखील ठाकूर यांनी म्हटले आहे. एका महिन्यात जर एवढी कुपोषित बालके आढळत असतील तर तत्पूर्वी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या नेमक्या काय करण्यात आल्या? असा सवाल ठाकूर यांनी उपस्थित केला आहे. याची अधिकची दखल शासन-प्रशासनाने घेण्याची गरज आहे.
संबंधित यंत्रणांना उपाययोजनांचे आदेश द्यावेत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी तातडीने या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन संबंधित यंत्रणांकडून आढावा घ्यावा आणि मेळघाटातील कुपोषण, उपजत मृत्यू आणि मातामृत्यू रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याबाबत आदेश द्यावेत अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केली आहे.