37.2 C
Latur
Tuesday, May 6, 2025
Homeमहाराष्ट्रमेळघाटात वीज कोसळल्याने दोन ठार

मेळघाटात वीज कोसळल्याने दोन ठार

महाराष्ट्रात वादळी वा-यासह गारपीट आंबा-केळी-द्राक्ष बागांचे नुकसान

जालना : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील अनेक भागांत वादळी वा-यासह गारपीट झाली. विदर्भात या पावसाने शेतीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून वादळी वा-यासह पाऊस होत आहे. त्यामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात अवकाळी पाऊस झाला. सोमवारी जळगाव तालुक्यासह जामनेर, पारोळा तालुक्यात वादळी वा-यासह मुसळधार पाऊस झाला. अमरावती जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह गारपीट झाली आहे. मेळघाटमध्ये वीज कोसळून दोन जण ठार झाले आहेत. तसेच चार जण जखमी झाले आहेत. चुणीलाल सावरकर (वय ४५) व सुरेश जामूनकर (वय ४५) या दोघांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये सोमवारी रात्री अचानक वातावरणात बदल झाला. त्यानंतर अवकाळी पाऊस सुरू झाला. दिवसभर कडाक्याचे ऊन अन् रात्रीच्या वेळी वादळी वारा तसेच विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. प्रचंड वेगाने असलेल्या वादळी वा-यामुळे दाणादाण उडाली. त्यानंतर अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला. या अवकाळी पावसामुळे शेतात कापून ठेवलेल्या मका, बाजरीसह विविध पिकांचे नुकसान झाले.

मराठवाड्यात अनेक भागांत गारपीट
जालना जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये सोमवारी सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारपीट झाल्यामुळे फळबाग उत्पादक शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. जालनामधील बदनापूर तालुक्यात वादळी वा-याच्या पावसाचा जोर अधिक होता. या पावसामुळे द्राक्ष बागांबरोबर केसर आंब्याच्या बागांचे नुकसान झाले. गारपिटीमुळे गारांचा खच बागेत पडला होता. परभणीच्या सेलू तालुक्यातील हिस्सी येथे अचानक सुटलेल्या वादळी वा-यामुळे शेतक-याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत कापसासह कडबा जळाला आहे.

अंबाजोगाई शहरासह परिसरात गारासह वादळी पाऊस झाला. अचानक पडलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. नांदेडमध्ये वादळी वा-यामुळे केळी बागांचे नुकसान झाले. या वादळी वा-यामुळे नांदेडच्या अर्धापूर, मुदखेड या तालुक्यातील केळी बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. केळीच्या बागा आडव्या झाल्या आहेत. अनेक केळी उत्पादक शेतक-यांची केळी काढणीला आली होती. परंतु अचानक वादळी वा-यामुळे आलेल्या पावसाचा केळीच्या बागेला मोठा फटका बसला.

नागपूरमध्ये सलग तिस-या दिवशी नागपूर शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली. तसेच काही भागात गाराही पडल्या. पावसाळी वातावरणामुळे दिवस-रात्रीचे तापमान पुन्हा खाली घसरले आहे. दिवसाचे कमाल तापमान ४.३ अंशाने घसरून ३८.४ अंशांवर आले आहे. नागपुरात १० मेपर्यंत अवकाळी पावसाची परिस्थिती राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
\\

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR