पंजाब नॅशनल बँकेत कोट्यवधींचा घोटाळा करणा-या मेहुल चोक्सी याच्या प्रत्यार्पणाची विनंती भारताने केल्यानंतर बेल्जियम पोलिसांनी त्याला अटक केली. सीबीआयच्या विनंतीवरून त्याला शनिवारी अटक करण्यात आली. कोट्यवधींचा कर्ज घोटाळा करून तो पळाला होता. १३ हजार ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप मेहुल चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदीवर आहे. ईडी आणि सीबीआयने त्याला ‘वॉण्टेड’ जाहीर केले होते. काही दिवसांपूर्वी चोक्सी आजारी असल्याची माहिती समोर आली होती. त्याला कर्करोग झाल्याची शक्यताही वर्तवण्यात आली होती.
मेहुल चोक्सीवर नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या कायद्यानुसार फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केल्यास चोक्सीच्या जप्त केलेल्या सा-या संपत्तीवर टाच आणण्याची प्रक्रिया तपास यंत्रणेने सुरू केली आहे. त्यामुळे त्याची आर्थिक कोंडी करणे शक्य होईल. मात्र, चोक्सीने प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देऊन तूर्तास भारतात परतणे शक्य नाही असे त्याच्या याचिकेत म्हटले आहे. त्यामुळे चोक्सी भारतात येण्याची प्रक्रिया लांबू शकते. मेहुल चोक्सीचा पासपोर्ट भारत सरकारने रद्द केला आहे. पीएमएलए न्यायालयात चोक्सीच्या पासपोर्ट निलंबनासंदर्भातील कागदपत्रे आणि त्याच्याविरुद्ध ईडी प्रकरणाच्या तपास फाईल्स मागवण्याचे निर्देशही यापूर्वी देण्यात आले होते. बेल्जियम पोलिसांनी चोक्सीला अटक केल्याने आता त्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाल्याचे म्हटले जात आहे. सुमारे १४ हजार कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला कर्करोगाची लागण झाली असून तो बेल्जियममध्ये एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती त्याच्या वकिलांनी फेब्रुवारी महिन्यात मुंबईतील ईडीच्या विशेष न्यायालयात दिली होती.
त्यानुसार शनिवारी बेल्जियम पोलिसांनी एका खासगी रुग्णालयातून त्याला अटक केली. पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी याचा मेहुल चोक्सी हा मामा आहे. या मामा-भाच्यानी पंजाब नॅशनल बँकेच्या काही उच्चपदस्थ अधिका-यांशी संगनमत करून बँकेची बनावट हमीपत्रे (लेटर ऑफ अंडरटेकिंग) तयार केली. या बनावट हमीपत्रांच्या सहाय्याने त्यांनी परदेशात बँकांकडून मोठ्या रकमेची कर्जे मिळवली. तसेच परदेशात क्रेडिट सुविधा मिळवून बँकेची सुमारे १४ हजार कोटी रुपयांची फसवणूक केली, असा आरोप आहे. ६५ वर्षीय चोक्सी हा भारतातील गीतांजली जेम्स लि. या कंपनीचा मालक आहे. त्याच्या हिरेजडित दागदागिन्यांची निर्मिती करणारा उद्योग २०१८ मध्ये पीएनबी घोटाळा उघड झाल्यानंतर बंद पडला. त्याच वर्षी चोक्सी भारताबाहेर फरार झाला. सुरुवातीला त्याने अँटिग्वा अँड बर्मुडा या देशाचे नागरिकत्व मिळवले. गतवर्षी तो बेल्जियममध्ये वास्तव्यास आला. भारतीय तपास यंत्रणांना गेली सात वर्षे गुंगारा देणा-या चोक्सीला अटक होण्याची ही पहिलीच वेळ नाही.
या आधी मे २०२१ मध्ये त्याला डोमिनिका देशात बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. तेव्हादेखील भारतीय तपास यंत्रणांनी त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न केले होते. मात्र, डोमिनिकाच्या न्यायालयाने त्याला वैद्यकीय उपचारासाठी पुन्हा अॅन्टिग्वाला जाण्याची परवानगी दिल्याने प्रत्यार्पणाचे प्रयत्न अपयशी ठरले होते. त्यानंतर ईडीने चोक्सीशी संबंधित २ हजार ५०० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. न्यायालयाने या मालमत्तांचा लिलाव करण्यास परवानगी दिली आहे. चोक्सीचे येणे ही काँग्रेससाठी डोकेदुखी ठरेल असे म्हटले जात आहे. कारण चोक्सी भारतातून पळाल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी भाजपवर तोफा डागल्या होत्या. केंद्रात भाजपचे सरकार होते. भाजपने त्याला पळून जाण्यासाठी मदत केली. सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे त्याला परत आणणे शक्य होेत नसल्याचा दावाही काँग्रेस नेत्यांनी केला होता. चोक्सी भारतातून पळाल्यानंतर काँग्रेसने मोठा गदारोळ केला होता. ‘सगळेच मोदी चोर असतात’ असे विधान करण्यापर्यंत मजल गेली होती.
या विधानाच्या विरोधात राहुल गांधी यांच्या विरोधात खटला दाखल करण्यात आला होता. भारताने जागतिक महाशक्ती असलेल्या अमेरिकेतून दहशतवादी तहव्वूर राणाला भारतात आणले आहे. त्या तुलनेत चोक्सी याला भारतात आणणे सोपे आहे. कारण त्याला बेल्जियममध्ये अटक झाली आहे. हिरे व्यापारी चोक्सी आणि नीरव मोदी यांनी पीएनबी बँकेला चुना लावून भारताबाहेर पलायन केले. चोक्सीचे काँगे्रस पक्षाशी संबंध असल्याने भाजप सरकार त्याला टार्गेट करीत आहे असा आरोप चोक्सीच्या वकिलांनी केला होता. गीतांजली जेम्स या चोक्सीच्या कंपनीने राजीव गांधी फाऊंडेशनला देणग्या दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. २०१५ मध्ये एका फसवणूक प्रकरणात मेहुल चोक्सीची बाजू मांडणारे वकील चंद्रमौली यांना काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिल्याचा आरोप भाजपने केला होता. चोक्सीशी संबंध असल्याचे आरोप काँग्रेस नेते पी. चिदम्बरम, अभिषेक मनु सिंघवी यांच्यावरही झाले आहेत. राजकारणात विरोधक एकमेकावर चिखलफेक करतच असतात. असो. किंगफिशरचे मालक विजय माल्ल्या, चोक्सी, नीरव मोदी यांच्या ब-याच मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. तहव्वूर राणाच्या पाठोपाठ आता चोक्सी आणि नीरव मोदी भारतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे लगेच होईल असे नाही.
कारण यात काही कायदेशीर अडथळे निर्माण होतात. चोक्सीची कंपनी गीतांजली जेम्स ही ईडीने दाखल केलेल्या अनेक आरोपपत्रांमध्ये समाविष्ट आहे. सीबीआयने चोक्सी, नीरव मोदी आणि बँक अधिका-यांसह इतरांवर फसवणूक, गुन्हेगारी कट आणि भ्रष्टाचारासंबंधी खटले दाखल केले आहेत. चोक्सीला भारतात आणल्यानंतर त्याचे कोणाकोणाशी संबंध आहेत ते स्पष्ट होईल. बडे उद्योगपती, व्यावसायिक यांनी देशातील बँकांकडून प्रचंड मोठ्या रकमेचे कर्ज घ्यायचे, नंतर त्या कर्जाची परतफेड करायची नाही आणि देशाबाहेर पलायन करून आरामात आलिशान आयुष्य जगायचं असा जो सिलसिला सुरू होता तो आता खतम होण्याच्या मार्गावर आहे. विजय माल्ल्या, मेहुल चोक्सी, नीरव मोदी, ललित मोदी, नितीन संदेसरा या लफडेबाजांच्या मुसक्या बांधून त्यांना भारतात आणले पाहिजे. त्यांनी केलेल्या कर्माचे फळ त्यांना दिलेच पाहिजे.