लातूर : प्रतिनिधी
शहरात फिरणारी मोकाट जनावारे पकडण्याची मोहीम मनपाने अशोक सेवा स्वच्छता सेवा मंडल यांच्यामार्फत हाती घेतली असून याअंतर्गत आतापर्यंत १५० जनावरे पकडण्यात आली आहेत. संबंधिताकडून एकूण १ लाख ५१ हजार ५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
शहरात फिरणा-या मोकाट गायी, बैल, म्हैस, रेडा, गाढव, शेळ्या आदी पशुंना पकडण्यासाठी ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. या अंतर्गत दि. १६ डिसेंबरपर्यंत १५० जनावरे पकडून सिकंदरपूर येथील कोंडवाड्यात बंदिस्त करण्यात आली होती. त्यापैकी ३४ जनावराच्या मालकाकडून १ लाख ५१ हजार ५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही सर्व जनावरे सिकंदरपुर येथे कोंडवाडा विभागात ठेवण्यात आली होती.
मनपाच्या वतीने बेवारस म्हणून घोषित करण्यात आलेल्या ९५ जनावरांचे कायमस्वरुपी संगोपन करण्यासाठी ती जनावरे अटी व शर्तींची पूर्तता करणा-या तीन गोशाळांना सुपूर्द करण्यात आली आहेत. सध्या मनपाकडे ९ मोकाट जनावरे शिल्लक आहेत. शहरातील पशुपालकांनी आपली जनावरे रस्त्यावर मोकाट सोडू नयेत,अन्यथा ती पकडून दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा पालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.