मुंबई : प्रतिनिधी
शिर्डीच्या साईबाबा संस्थानने देणगीदार भाविकांसाठी नवीन ‘डोनेशन पॉलिसी’ जाहीर केली असून हे धोरण तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर राबवले जाणार आहे. यामध्ये विशेषत: मोठ्या देणगीदारांना व्हीआयपी आरती व दर्शनाची सुविधा देण्यात येणार आहे. या नव्या धोरणानुसार आता १० हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक देणगी देणा-या भाविकांनाही साईबाबा मंदिरातील आरतीचा विशेष लाभ मिळणार आहे. याआधी ही मर्यादा २५ हजार रुपये इतकी होती.
याबाबत साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर म्हणाले की, साईबाबांच्या दर्शनासाठी भारतभरातून लाखो साई भक्त येत असतात. साई भक्तांचे दर्शन चांगल्या रीतीने व्हावे, त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी साईबाबा संस्थानने प्रयत्न केलेला आहे. जे साई भक्त इथे देणगी देतात, त्यांची मागणी होती की, देणगी दिल्यानंतरच्या सुविधा साईबाबा संस्थानने निर्माण कराव्यात, त्या अनुषंगाने संस्थानने नवीन डोनेशन पॉलिसी तयार केल्याची माहिती त्यांनी दिली.
– दहा हजार ते पन्नास हजार रुपये देणगी देणा-या भाविकांना आरतीचा लाभ मिळणार आहे. पाच सदस्यांसाठी ही सुविधा देण्यात येणार आहे. यासोबतच ५० हजार ते एक लाख देणगी देणा-या भाविकांसाठी २ आरत्यांचा लाभ तसेच वर्षातून एकदा कुटुंबातील ५ सदस्यांना मोफत दर्शनाचा लाभ मिळणार आहे. याशिवाय १ लाख ते १० लाख देणगी देणा-यांना दोन व्हीव्हीआयपी आरत्यांचा लाभ मिळणार आहे. तसेच वर्षातून एकदा दर्शनाची लाईफटाईम सुविधादेखील मिळणार आहे.
१० ते १५ लाख देणगी,
२ वेळा व्हीआयपी आरती
१० लाख ते १५ लाख रुपयांची देणगी देणा-यांना वर्षातून दोन व्हीव्हीआयपी आरती तसेच वर्षातून एकदा पाच सदस्यांना लाईफटाईम व्हीआयपी दर्शनाची सुविधा मिळणार आहे. ५० लाखांच्या पुढे तीन व्हीव्हीआयपी आरती तर वर्षातून दोनदा लाईफटाईम व्हीआयपी दर्शनाची सुविधा मिळणार आहे.