नवी दिल्ली : प्रतिनिधी
नरेंद्र मोदी रविवारी संध्याकाळी सलग तिस-यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती रविवारी संध्याकाळी ७:१५ वाजता राष्ट्रपती भवनात पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्री परिषदेच्या इतर सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देणार आहेत. त्याची तयारी मोठ्या उत्साहात आणि सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करून केली जात आहे.
या शपथविधीसाठी ज्या पाहुण्यांना बोलावले जाणार आहे, त्या यादीमध्ये समाविष्ट असलेले ऐश्वर्या मेनन आणि सुरेखा यादव ही नावे सध्या चर्चेत आहे. ऐश्वर्या एस. मेनन, दक्षिण रेल्वेच्या चेन्नई विभागातील वरिष्ठ सहाय्यक लोको पायलट आहेत. या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिस-या कार्यकाळाच्या शपथविधी समारंभासाठी निमंत्रित करण्यात आलेल्या ८,००० विशेष अतिथींमध्ये त्यांचा समावेश आहे. ऐश्वर्या मेनन यांनी वंदे भारत एक्सप्रेस आणि जनशताब्दी सारख्या विविध गाड्यांचे २ लाखांहून अधिक फुटप्लेट तास पूर्ण केले आहेत. मेनन यांनी चेन्नई-विशाखापट्टणम आणि चेन्नई-कोयंबतूर वंदे भारत एक्सप्रेस सेवांवर देखील काम केले आहे.
आशियातील पहिल्या महिला लोको पायलट, सुरेखा यादव, या देखील पंतप्रधान मोदी यांच्या शपथविधी समारंभात उपस्थित राहणार आहेत. यादव या सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस चालवत आहेत आणि त्या समारंभासाठी निमंत्रित असलेल्या १० लोको पायलटांपैकी एक आहेत. १९८८ मध्ये भारताच्या पहिल्या महिला ट्रेन ड्रायव्हर बनलेल्या यादव या सेमी-हाय स्पीड वंदे भारत एक्सप्रेसच्या पहिल्या महिला लोको पायलट आहेत.
सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावर काम करणारे स्वच्छता कर्मचारी, ट्रांसजेंडर आणि मजूर हे देखील या शपथविधी समारंभात विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती भवनात या समारंभासाठी ८,००० हून अधिक अतिथींसाठी व्यवस्था करण्यात आली आहे.