पुणे : प्रतिनिधी
मोदींचे नेतृत्व आश्वासक आहे. मोदींना लोकसभा निवडणुकीत कमी जागा मिळाल्याने जग हळहळले आहे. गेल्या काही दिवसांत भाजपचे मित्रपक्ष फोडण्यासाठी कमी प्रयत्न झाले का? पण, भाजपचे सरकार स्थापन झाले. त्यामुळे सरकार अडचणीत येईल असे वाटत नाही, असेही चंद्रकांत पाटलांनी म्हटले.
लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपने ‘चारसौ पार’चा नारा दिला होता. पण, भाजपच्या ‘चारसौ पार’च्या ना-यावर पाणी फेरले आहे. भाजपला ‘३०० पार’ही करता आले नाही. भाजपला २४० जागा मिळाल्या आहेत. तर ‘एनडीए’ला २९४ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
२०१४ आणि २०१९ मध्ये भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करता येईल, असे खासदार होते. पण, आता भाजपला मित्रपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करावी लागत आहे. यातच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानाची चर्चा रंगली आहे. मोदींना कमी जागा मिळाल्याने जग हळहळले आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
मोदी सरकार जास्त काळ टिकेल, असे वाटत नसल्याचे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी केले. याबद्दल विचारल्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, आशावाद हा प्रत्येकाला असलाच पाहिजे. त्याशिवाय तुम्ही संघर्ष करत नाही. आणि दुस-याला संघर्ष करण्यासाठी प्रवृत्त करत नाही. नेत्याने कार्यकर्त्यांना संघर्ष करण्यासाठी प्रोत्साहित करायचे असते.