विदेशातून येताच डॉ. पाटील यांच्यावर कारवाई, १५ तास चौकशी
मुंबई : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह टीका केल्याचा ठपका ठेवत भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक डॉ. संग्राम पाटील यांची मुंबई गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली. शनिवारी पहाटे त्यांना मुंबई विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले. डॉ. संग्राम पाटील यांची तब्बल १५ तासांनंतर मुंबई पोलिसांनी सुटका केल्याची माहिती आहे. मुंबई पोलिसांनी केलेल्या या कारवाईवर विरोधी पक्षांकडून जोरदार टीका केली जात आहे.
डॉ. संग्राम पाटील हे युके चे नागरिक असल्याने मुंबई पोलिस त्यांना अटक करू शकले नाहीत, अशी माहिती आहे. चौकशी झाल्यानंतर संग्राम पाटील हे त्यांच्या मूळगावी म्हणजे जळगाव जिल्ह्यातील एरंडोलकडे रवाना झाले. डॉ. संग्राम पाटील हे त्यांच्या पत्नीसोबत शनिवारी पहाटे २.३० च्या सुमारास लंडनवरुन मुंबई विमानतळावर पोहोचले. ते विमानतळावर येताच मुंबई पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.
१४ डिसेंबर २०५ रोजी शहर विकास आघाडी या नावाने असलेल्या सोशल मीडिया अकाउंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात एक मजकूर प्रसिद्ध झाला. त्यावर भाजपच्या सोशल मीडिया संयोजकांनी तक्रार दाखल केली. याच तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी संग्राम पाटील विरोधात कारवाई केली. संग्राम पाटील ब्रिटनचे नागरिक असल्याने त्यांना अटक करण्यात आली नसल्याचे मत अॅड. असीम सरोदे यांनी मांडले.
भाजपचे लोक एका
माणसाला घाबरले
संग्राम पाटील यांच्या चौकशीनंतर विरोधी पक्षाच्या विविध नेत्यांनी त्यावर टीका केली. त्याला दडपून लोकांची दिशाभूल करणारे भाजपवाले एका माणसाला का घाबरलेत, असा प्रश्न काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी विचारला. डॉ. पाटील यांना विमानतळावर करण्यात आलेली अटक ही भाजप सरकारच्या डरपोकपणाचे जिवंत उदाहरण आहे. या कारवाईचा जाहीर निषेध करतो, असे सतेज पाटील म्हणाले.

