मुंबई : विशेष प्रतिनिधी
महायुती सरकारच्या आजच्या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा तिघांचाच शपथविधी होणार आहे. त्यानंतर ७ डिसेंबर रोजी महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असून त्यामध्ये ३० पेक्षाही अधिक नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रवादी नेते अनिल पाटील यांनी याबाबतची माहिती दिली.
मुंबईच्या आझाद मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यात, राज्य शासनाने त्र्यंबकेश्वर आणि नाशिकच्या अनेक साधू-संतांना या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. त्यात रामकृष्ण महाराज लहवितकर, महंत भक्तिचरणदास, महंत गणेशानंद सरस्वती, महंत रमणगिरी महाराज, माधवदास राठी, ह.भ.प. संजय धोंडगे, महंत सुधीरदास पुजारी, स्वामी संविदानंद सरस्वती, कांचनताई जगताप अशा मान्यवरांचा समावेश आहे. तसंच महंत डॉ. अनिकेतशास्त्री देशपांडे यांचे नाव या यादीत विशेष उल्लेखनीय आहे. सागर बंगल्यावरही महंत येण्यास सुरुवात झाली आहे.
मोदींसह ४० हजार लोकांची हजेरी
भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी सुमारे ४० हजारहून अधिक पाहुणे मंडळी उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, ९ ते १० केंद्रीय मंत्री, १९ मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कार्यक्रमास उपस्थिती दर्शवणार आहेत.
दिग्गजांची उपस्थिती
राज्यात महायुती सरकार स्थापन होत असून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला देशभरातील भारतीय जनता पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, त्रिपूराचे मुख्यमंत्री माणिक सहा, सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमंग, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्पक सिंग धामी, अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खंडू, आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, मध्यप्रदेशचे उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ला, मध्यप्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मोर्य, ब्रिजेश पाठक, प्रवीण तोगडिया, राजस्थानचे उपमुख्यमंत्री प्रेमचंद बैरवा, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय कुमार रूपानी आदी नेते उपस्थित राहणार आहेत.