बक्सर : वृत्तसंस्था
बिहारमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपसह काँग्रेसने राज्यात विविध ठिकाणी प्रचारसभा सुरू केल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बक्सरमधील एका सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या जेडीयू आणि भाजप युतीला संधीसाधू म्हटले.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बक्सर येथील दलसागर स्टेडियमवर आयोजित ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ रॅलीला संबोधित केले. यावेळी त्यांनी नितीश कुमार आणि भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) युतीला संधीसाधू म्हटले. नॅशनल हेराल्ड प्रकरणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि आरएसएसवर धमकीचे राजकारण केल्याचा आरोपही केला.
खर्गे पुढे म्हणाले, बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार फक्त सत्तेसाठी वारंवार बाजू बदलतात. नितीश यांनी महात्मा गांधींची हत्या करणा-या विचारधारेशी युती केली आहे. बिहारच्या जनतेने मुख्यमंत्र्यांना विचारावे की, २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याला दिलेल्या १.२५ लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचे काय झाले? आता बिहारमधून एनडीए सरकार गेलं पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
मल्लिकार्जुन खर्गेंनी यावेळी नॅशनल हेराल्ड प्रकरणावरही भाष्य केले. ते म्हणाले की, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरुद्ध ईडीकडून आरोपपत्र दाखल करून भाजप सूडाचे राजकारण करत आहे. पण, आम्ही घाबरणार नाही. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दुर्बल घटकांच्या विरोधात असल्याचा आरोप मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.