25.4 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeमहाराष्ट्रमोदी-शहांचा कारभार ‘सब कुछ गुजरात्यांसाठी’

मोदी-शहांचा कारभार ‘सब कुछ गुजरात्यांसाठी’

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा सध्याचा कारभार हा ‘सब कुछ गुजरात्यांसाठी’ असाच आहे. गुजरात आणि गुजरात्यांना आर्थिकदृष्ट्या प्रबळ करा. देशभरातील सर्व आर्थिक लाभ, ठेके गुजरात्यांनाच द्या. त्यातून वाराणसी आणि अयोध्याही सुटली नाही, असा हल्लाबोल ठाकरे गटाने केला आहे.

स्वत: नरेंद्र मोदी हे देशाचे नव्हे तर गुजरातचेच पंतप्रधान असल्याप्रमाणे वागत आहेत. गुजरात मजबूत झाले तरच देश मजबूत होईल आणि त्यासाठी त्यांनी आपल्या गुजराती उद्योगपती मित्रांना देश लुटण्याची परवानगी दिली. ही अस्मिता नसून ओरबाडणे झाले, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखाच्या माध्यमातून सुनावले आहे.

मोदी-शहांनी मराठी माणसावर थेट आक्रमणच केले. हे औरंगजेबी आक्रमण मराठी माणसाच्या एकजुटीने कालच्या निवडणुकीत सीमेवरच रोखले, पण मिंधे (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) आणि त्यांचे मित्र महामंडळ ‘मनसे’ मराठीच्या दुष्मनांच्या चरणाशीच बसले आहे. हे दुर्दैवच म्हणावे लागेल, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाने केली आहे.
मुंबईचा लढा हा मराठी अस्मितेचा व मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांचा लढा होता. आजही तो लढा संपलेला नाही. मुंबई आणि आसपासच्या प्रदेशांवर आदळणा-या लोंढ्यांनी मराठी भाषा आणि संस्कृतीचे मातेरे केलेच, पण मराठी माणसाचे हक्क मारले गेले. गिरणी कामगार शंभर टक्के मराठी होता. त्यांच्या गिरण्या आज राहिल्या नाहीत. तेथे टॉवर्स उभे राहिले आणि याच टॉवर्सनी मराठी भाषा आणि मराठी माणसाशी उभा दावा मांडला आहे, असे या अग्रलेखात म्हटले आहे.

महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात ‘मराठी सक्तीची’ हा कायदा झाला. मराठी भाषा भवन दिमाखदार उभारण्याची पायाभरणी झाली. मराठी शाळांना संरक्षण दिले. मराठी माणसांना नोकरीधंद्यात प्राधान्य मिळण्यासाठी कायदे आणि संघर्ष झालेच, पण सध्याचे मिंधे सरकार मराठी अस्मितेबाबत तडजोडीचेच धोरण स्वीकारीत आहे, असा आरोपही ठाकरे गटाने केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR