36.4 C
Latur
Wednesday, April 30, 2025
Homeमहाराष्ट्रमोदी सरकारची प्रत्येक योजना म्हणजे ‘नाव मोठे, लक्षण खोटे’

मोदी सरकारची प्रत्येक योजना म्हणजे ‘नाव मोठे, लक्षण खोटे’

मुंबई : प्रतिनिधी
मोदी सरकार जाहीर करीत असलेली प्रत्येक योजना आतापर्यंत ‘नाव मोठे, लक्षण खोटे’ अशीच ठरली आहे. राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची ‘जलजीवन योजना आजच्या घडीला पूर्णपणे फेल झाली असून त्यामुळे ग्रामीण जनतेला, आदिवासींना सध्याच्या पाणीटंचाईच्या काळात पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे,’ अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मोदी सरकारच्या ‘ड्रीम प्रोजेक्ट’चे वस्त्रहरण ‘सामना’मधून केले आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी योजना जाहीर करताना बतावणी तर खूप करतात. देशात आता क्रांतीच होणार, असाच त्यांचा आव असतो. जनतेसमोर चित्रदेखील तसेच उभे केले जाते; परंतु प्रत्यक्षात ती योजना सर्वसामान्यांसाठी ‘नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा’च ठरते. मोदी सरकारच्या प्रत्येक योजनेची अवस्था हीच झाली आहे. अशा ‘फेल’ योजनांमध्ये आता आणखी एका योजनेची भर पडली आहे. ‘जलजीवन मिशन’ असे या योजनेचे नाव आहे आणि या मिशनचा ढोल महाराष्ट्राच्या एका मंत्रिमहोदयांनीच फोडला आहे, अशी टीका ठाकरे यांनी मोदी सरकारवर केली आहे.

राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची ‘जलजीवन योजना आजच्या घडीला पूर्णपणे फेल झाली असून त्यामुळे ग्रामीण जनतेला, आदिवासींना सध्याच्या पाणीटंचाईच्या काळात पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.
पंतप्रधान मोदी यांनी १५ ऑगस्ट २०१९ रोजी ‘जलजीवन मिशन’ या योजनेची घोषणा केली होती. देशाच्या ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळाने पाणी पुरविणे हे या योजनेचे उद्दिष्ट होते. योजना जाहीर झाली तेव्हा देशाच्या ग्रामीण भागात फक्त ३.२३ कोटी घरांमध्येच नळाद्वारे पाणीपुरवठा होत होता. जलजीवन मिशनमार्फत २०२४ पर्यंत आणखी सुमारे १६ कोटी घरांना नळाद्वारे पाणी पुरविणार, असे जाहीर करण्यात आले होते. त्यासाठी ‘हर घर नल, हर घर जल’ अशी आकर्षक घोषणाबाजीही केली गेली. मात्र शेकडो-हजारो कोटी रुपये खर्च होऊनही ग्रामीण जनतेला आणि गरीब आदिवासींना थेंबभर पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट करावीच लागत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकीकडे जलसंधारणाचा आढावा घेताना ‘माथा ते पायथा’ तत्त्वानुसार कामे घेण्याचे निर्देश प्रशासनाला देत आहेत आणि तिकडे त्यांचे एक मंत्री जलजीवन मिशन कसे पूर्ण फेल झाले आहे याची कबुली देत आहेत. तांत्रिक कारणे आणि निधीअभावी अनेक योजना ठप्प झाल्या. अनेक ठिकाणी पाण्याचे स्रोत कोरडे पडले.

‘ना नल, ना जल’ अशी अवस्था
‘हर घर नल, हर घर जल’ ही मोदींची वल्गना हवेत विरून गेली. ‘ना नल, ना जल’ अशी राज्याच्या ग्रामीण-आदिवासी भागाची अवस्था झाली. तेथील जनतेचा थेंबभर पाण्यासाठीचा जीवघेणा संघर्ष याही उन्हाळ्यात सुरूच राहिला. ‘जलयुक्त शिवार’ ते ‘जलजीवन मिशन’ असा हा राज्यातील पाणीटंचाईचा प्रवास आहे. तेव्हा फक्त जलजीवन मिशन पूर्ण फेल झाले एवढेच सांगू नका, पाणी कुठे मुरले तेदेखील सांगा, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR