लातूर : प्रतिनिधी
विलासराव देशमुख फाऊंडेशनच्या वतीने बाभळगाव येथे सुरू करण्यात आलेल्या मोफत ब्युटीपार्लर प्रशिक्षण केंद्रास विलास सहकारी साखर कारखाना चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी दि. २२ ऑगस्ट रोजी भेट दिली तसेच प्रशिक्षणार्थी महिला भगिनीसोबत संवाद साधला.
विलासराव देशमुख फाऊंडेशनने महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. ट्वेंटीवन अॅग्रीच्या संचलिका सौ. अदितीताई अमित देशमुख यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगार आणि स्वावलंबनासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या अंतर्गत बाभळगाव येथे विलासराव देशमुख फाऊंडेशनच्या वतीने महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी मोफत ब्युटीपार्लर प्रशिक्षण केंद्राची सुरूवात करण्यात आली असून या केंद्रास विलास सहकारी साखर कारखाना चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी शुक्रवारी सदिच्छा भेट दिली आणि या ठिकाणी प्रशिक्षण घेणा-या प्रशिक्षणार्थी महिला भगिनींशी संवाद साधला व महिलांनी या प्रशिक्षणातून स्वत:च्या पायावर उभे राहावे व आपली आर्थिक प्रगती करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
ग्रामीण व शहरी भागात महिलांसाठी रोजगाराच्या संधी कमी असतात. या पार्श्वभूमीवर विलासराव देशमुख फाऊंडेशन महिलांना मोफत प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या दिशेने प्रयत्नशील आहे. या प्रशिक्षण केंद्रामध्ये महिलांना पार्लर विषयीची प्राथमिक माहिती देऊन प्रशिक्षण दिले जात आहे. यामध्ये वॅक्सिंग, विविध हेअर कट, मॅनिक्युअर, पेडिक्युअर, थ्रेडिंग, मेकअप, फेशियल याविषयी प्रशिक्षण दिले जात आहे. महिला भगिनींनी या प्रशिक्षणाबद्दल विलासराव देशमुख फाऊंडेशनचे आभार मानले. या वेळी फाऊंडेशनच्या समन्वक संगीता मोळवणे, गावचे उपसरपंच गोविंद देशमुख, माजी उपसरपंच अविनाश देशमुख, गावातील प्रमुख व्यक्ती, ट्रेनर शबाना शेख, गजानन बोयने, प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या.