लातूर : प्रतिनिधी
संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागून असलेल्या लातूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थान यात्रेतील कुस्ती स्पर्धेत मोहोळ येथील मल्ल रोहन पवार याने मानाची सिद्धेश्वर केसरीची चांदीची गदा पटकावली. दिंडेगाव येथील फिरोज शेख हा उपविजेता ठरला. सिद्धेश्वर यात्रेतील कुस्ती स्पर्धा हे सर्वांसाठी आकर्षण असते.
सोमवार दि. १६ मार्च रोजी ही स्पर्धा पार पडली. सकाळी ११ वाजता सुरु झालेल्या या स्पर्धेतील शेवटची कुस्ती मध्यरात्रीनंतर झाली. राज्यभरातून आलेल्या सुमारे ५०० मल्लांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे यंदा आठ महिला मल्लांनीही स्पर्धेत भाग घेतला. अटीतटीच्या झालेल्या या स्पर्धेत सहभागी मल्लांनी प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. मानाच्या सिद्धेश्वर केसरीसाठी रोहन पवार व फिरोज शेख यांच्यात अटीतटीची लढत झाली. यात रोहन पवार यांनी फिरोज शेख यास चितपट केले. विजेता रोहन पवार यास देवस्थानचे प्रशासक सचिन जांबुतकर, विश्वस्त अशोक भोसले, सुरेश गोजमगुंडे, बाबासाहेब कोरे, रमेशसिंह बिसेन, व्यंकटेश हालिंगे, विशाल झांबरे, ओम गोपे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत चांदीची गदा प्रदान करण्यात आली.
मानाच्या गदेसह इतरही अनेक पारितोषिके यावेळी देण्यात येतात. गतवर्षी पावसामुळे काही स्पर्धा झाल्या नव्हत्या तसेच पारितोषिकांचे वितरण रखडले होते. यावर्षी त्या स्पर्धा घेत पारितोषिके देण्यात आली. मनपाकडून ५१ तोळे चांदीचे कडे पारितोषिक म्हणून दिले जाते. वायगाव येथील गणेश साळुंके व पानचिंचोली येथील भैरवनाथ जोगी यांनी हे कडे जिंकले. रायगड ग्रुपचे अमर कोकाटे यांच्याकडून दिले जाणारे ५१ तोळे चांदीचे कडे आष्टा येथील विष्णू तातपुरे व हसेगाव वाडी येथील तुषार लवटे यांना प्रदान करण्यात आले. ओम गोपे, जयप्रकाश गोपे यांच्या वतीने देण्यात येणारे २१ तोळे चांदीचे कडे शिवप्रसाद खरोसेकर तर केतन हलवाई यांच्या वतीने दिले जाणारे २१ तोळे चांदीचे कडे आष्टा येथील महेश तातपुरे यांनी जिंकले.विजेत्या मल्लांची मैदानापासून मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. मल्लांनी श्री सिद्धेश्वरांचे दर्शन घेतले.
या स्पर्धेचे संचलन महादेव मेहकरे व गोविंद घारगे यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विश्वस्त मंडळाच्या पदाधिका-यांसह कपिल भोसले, शरद पवार, शिवाजी काळे, आशिष क्षीरसागर आणि लातूर जिल्हा कुस्तीगीर परिषदेच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.