मुंबई : वृत्तसंस्था
विदेशात नोकरीचे प्रलोभन दाखवत सायबर गुलाम बनविलेल्या ६० भारतीयांची म्यानमारमधून सुटका करण्यास महाराष्ट्र सायबरला यश आले आहे. याप्रकरणी राज्य सायबरने तीन गुन्हे नोंदवत मनीष ग्रे उर्फ मॅडी, तैसन उर्फ आदित्य रवी चंद्रन, रूपनारायण रामधर गुप्ता, आणि जेन्सी रानी डी या चार भारतीयांसह तलानीती नुलाक्सी चीन/कझाकस्तानी नागरिक अशा पाच आरोपींना अटक केली.
म्यानमारमध्ये नेलेल्या काही तरुणांनी कुटुंबीयांशी संपर्क साधत येथून सुटका करण्याची विनंती केली. त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे मदतीची मागणी केली. या प्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी केंद्र सरकारच्या मदतीने ऑपरेशन राबवत एकूण ६० जणांची सुखरूप सुटका केली. मुख्य आरोपींपैकी एक असलेला मनीष ग्रे/मॅडी हा अभिनेता असून त्याने वेब मालिका आणि दूरदर्शन कार्यक्रमांमध्ये काम केले आहे. थायलंडमध्ये रोजगाराच्या संधी मिळवून देण्याच्या नावाखाली व्यक्तींची भरती करणे, त्यांची म्यानमारमध्ये तस्करी करणे यात त्याची मुख्य भूमिका होती. तो म्यानमार, थायलंड, मलेशिया आणि भारतासह अनेक ठिकाणांहून सक्रियपणे कार्यरत असल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
सशस्त्र बंडखोरांच्या ताब्यात दिल्यानंतर पीडितांना एका कंपाउंडमध्ये कोंडले जाते. त्यानंतर सायबर फसवणूक, शेअर्स ट्रेडिंग, गुंतवणूक, टास्क, डिजिटल अटक अशी कामे करण्यासाठी त्यांचा छळ होत असे. त्यास विरोध करताच त्यांच्या शरीराचे भाग काढून त्यांची विक्री करण्याची धमकी दिली जात होती. सर्वत्र सशस्त्र बंडखोर तैनात असल्याने येथे तरुणांना जीवाच्या भीतीने काम करावे लागत असल्याचे तरुणांच्या चौकशीत समोर आले.