नेपिता : म्यानमारमध्ये शुक्रवारी (२८ मार्च) विनाशकारी भूकंपाने हाहाकार माजवला असून आतापर्यंत ६९४ जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. तसेच १६७० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेच्या अंदाजानुसार, म्यानमारमध्ये या भूकंपामुळे १०,००० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. या भूकंपाचे धक्के भारत, चीन, थायलंड आणि बांगलादेशमध्येही जाणवले.
म्यानमारमध्ये शुक्रवारी सकाळी ११.५० वाजता ७.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. हा भूकंप म्यानमारच्या इतिहासातील सर्वांत मोठा भूकंप असल्याचे सांगितले जात आहे. केवळ १२ मिनिटांनी ६.४ रिश्टर स्केलचा दुसरा भूकंप झाला, ज्यामुळे विध्वंस अधिक वाढला. यानंतर म्यानमारमध्ये १० तासांत तब्बल १५ वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. त्यापैकी एक भूकंप ६.७ रिश्टर स्केलचा होता. थायलंडमध्येही या भूकंपाचा मोठा फटका बसला असून १० जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे, तर १०० हून अधिक लोक बेपत्ता आहेत.
या भूकंपानंतर समोर आलेले व्हीडीओ आणि छायाचित्रे हृदय पिळवटून टाकणारी आहेत. अनेक ठिकाणी इमारती कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. नागरिक घाबरून रस्त्यांवर धावत सुटले, तर काही ठिकाणी लोक ढिगा-याखाली अडकले असल्याचे भयावह दृश्य दिसून आले. थायलंडची राजधानी बँकॉकमध्येही या भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. अनेक उंच इमारती हलताना दिसल्या, तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. म्यानमारमधील अनेक भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून हजारो कुटुंब बेघर झाली आहेत. म्यानमारच्या लष्कराने मदतीचे आवाहन केले आहे.