लातूर : प्रतिनिधी
ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशनच्या अविरत कार्याचा २१०२ व्या दिवसाच्या आनंद सोहळा तसेच ज्येष्ठ बागकर्मी यांचा सत्कार समारंभ दि. २ मार्च रोजी जिल्हा उद्योग केंद्र, लातूर येथे आयोजित केला होता. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख होते. यावेळी बोलताना त्यांनी यज्ञ म्हणजे केवळ आहुतीच देणे नव्हे तर त्याला अनुरुप कार्य करणे होणे. वृक्ष लावुन न थांबता वृक्ष संवर्धन करणे महत्वाचे आहे, असे मत व्यक्त केले.
यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी ग्रीन लातूर वृक्ष फाऊडेशनच्या कामाचे भरभरुन कौतुक करत, निसर्ग सेवेसाठी अर्थातच आपलं लातूर हरीत लातूर, सुंदर लातूर आणि स्वच्छ लातूर या संकल्पनेला मूर्त स्वरुप देण्यासाठी मागील २१०२ दिवसांचा प्रवास हा सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले. आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाऊडेशनच्या सर्वच सदस्यांनी मिळून वृक्ष संवर्धन हि लातूरची एक नवीन संस्कृती निर्माण केल्याचे मत त्यांनी व्यक्त करत, पूर्वी यज्ञ म्हणलं की वृक्षांची आहुती द्यायचे एवढेच माहिती होते, परंतु आमचं ग्रीन लातूर वृक्ष फा.च्या सदस्यांनी वृक्ष लागवड आणि संवर्धनचा यज्ञ पेटवला असून या यज्ञात वृक्षांची आहुती दिली जात नसून वृक्ष लागवडी साठीचा यज्ञ पेटवलेला असल्याचे सांगत या यज्ञाला तेवत ठेवण्यासाठी तुम्ही सर्वजण कष्ट घेत आहातच, आम्ही या यज्ञा करीता कधीच समिधा कमी पडु देणार नाही, असेही ते म्हणाले.
जिल्हा उद्योग केंद्र येथे उभारण्यात आलेल्या अमृत गार्डन, कॅक्ट्स गार्डन, चाफा गार्डन, रोज गार्डन खूपच छान असल्याचे सांगत असे असंख्य पॅच आपल्याला शहरात निर्माण करता येतील, त्यामुळे नागरिकांना निवांत बसण्यासाठी, चालण्यासाठी, व्यायामासाठी आणि शुद्ध हवेसाठी सोईचे आणि गरजेचे असल्याचे सांगितले तसेच जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रवीण खडके यांच्या प्रशासकीय कामाचे तसेच निसर्गावरील प्रमाचे कौतुक करत एक डोळस अधिकारी आपल्या लातूरला लाभल्याचे समाधान व्यक्त केले. प्रास्ताविक अॅड. वैशाली लोंढ यांनी केले. डॉ. भास्कर बोरगावकर यांनी आढावा मांडला. कार्यकमास माजी आमदार त्रिंबक भिसे, यशवंतराव पाटील, संभाजी सूळ, लालासाहेब चव्हाण, सचिन दाताळ, बाळासाहेब पाटील, रामदास काळे, ग्रीन लातूर वृक्ष फाऊडेशनचे सर्वच सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचलन मछिंद्र चाटे व संगीता घोडके यांनी केले तर डॉ. पवन लड्डा यांनी आभार मानले.