कीव : वृत्तसंस्था
एकीकडे रशिया आणि युक्रेनमध्ये मागच्या तीन वर्षांपासून सुरू असलेले युद्ध थांबवून शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे युक्रेन आणि रशियाकडून एकमेकांवर हल्ले सुरूच आहेत. युक्रेनने रशियावर ड्रोनद्वारे हल्ला केल्यानंतर आता रशियाने युक्रेनवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे. रशियाने केलेल्या या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याचे तसेच चार परदेशी नागरिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
रशियाने युक्रेनमधील ओदेशा बंदरावर गहू भरत असलेल्या एका जहाजावर क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला केला. या हल्ल्यात चार परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला. तर २ जण जखमी झाले. हा हल्ला मंगळवारी रात्री करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
ओदेशामधील लष्करी अधिकारी ओलेन कायपर यांनी सांगितले की, मंगळवारी रात्री करण्यात आलेल्या या हल्ल्यासाठी रशियाकडून बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला. ओदेशा बंदरावर करण्यात आलेल्या हल्ल्यादरम्यान, एक क्षेपणास्त्र बार्बाडोसचा झेंडा असलेल्या एमजे पिनार या जहाजावर आदळले. त्यामुळे या जहाजाचं नुकसान झालं. तसेच या हल्ल्यात चार सिरियाई नागरिक मारले गेले.
दरम्यान, युक्रेनने रशियावर जोरदार ड्रोन हल्ला केला होता. त्यामुळे रशियाची राजधानी मॉस्कोमधील अनेक इमारतींना आग लागली होती. या शहराच्या दिशेने झेपावत असलेले ६० ड्रोन नष्ट करण्यात आल्याची माहिती मॉस्कोचे महापौर सर्गैई सोबयानिन यांनी दिली होती.