मॉस्को : वृत्तसंस्था
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धस्थिती गंभीर होत आहे. गुरुवारी युक्रेनने रशियन सैन्याच्या उपकमांडरची हत्या केली. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला आहे. कारण हत्या झालेले उपकमांडर हे रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे जवळचे व्यक्ती मानले जातात. त्यामुळे आता रशियाने आक्रमक पवित्रा घेतला असून युक्रेनी नागरिकांना छळ करून मारणार असल्याचे म्हटले आहे.
रशियन सैन्य युक्रेनच्या राजधानीवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागत आहे. त्यानंतर आता युक्रेनियन लोकांना मारण्यासाठी रशियाने आता रासायनिक शस्त्रांचा वापर सुरु केला आहे. पुतीन यांनी जवळच्या लोकांना गमावल्यानंतर रागाच्या भरात हा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. नेदरलँड्सच्या गुप्तचर संस्थांनी युक्रेनमध्ये रशियाकडून हल्ला करण्यात आलेल्या रासायनिक शस्त्रांचे पुरावे गोळा केले आहेत. महत्वाची बाब म्हणजे या शस्त्रांवर बंदी घातलेली आहे.
नेदरलँड्सचे गुप्तचर प्रमुख पीटर रिसिंक यांनी म्हटले की, ‘युद्धात आघाडी मिळविण्यासाठी रशियाने रासायनिक शस्त्रांचा वापर वाढवला आहे. आतापर्यंत असे हजारो हल्ले झाले आहेत. तब्बल ९००० प्रकरणे नोंदवली गेली आहेत.’ रासायनिक शस्त्रांच्या हल्ल्यांमुळे सुमारे २५०० युक्रेनियन नागरिक जखमी झाले आहेत. तसेच ३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. युद्धात रासायनिक शस्त्रांचा वापर करण्यास बंदी आहे. हा संपूर्ण जगासाठी धोका आहे असं युक्रेनने म्हटलं आहे.
संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाकडून युक्रेनियन लोकांवर वापरल्या जाणा-या रासायनिक शस्त्रांवर १९९७ मध्ये बंदी घालण्त आली होती. या रासायनिक शस्त्रामुळे त्वचा, डोळे आणि श्वसनमार्गाला तीव्र जळजळ होऊ शकते. तसेच हे खाण्यात आले तर तोंड आणि पोटात जळजळ, मळमळ आणि उलट्या तसेच श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. तसेच रोगप्रतिकारक क्षमता कमी असलेल्या नागरिकांचा मृत्यूही होऊ शकतो.