नवी दिल्ली : वृत्तसंस्था
काश्मीर खो-यातील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत होता. या संतापानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील दहशतवाद्यांना, हल्लेखोरांना सोडणार नाही, अशा शब्दात सरकारची भूमिका जाहीर केली. त्यानंतर पाकिस्तानविरुद्ध व्यापार संबंध, जलसिंधू करार यासह अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले तर ७ मे रोजी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअर स्ट्राईक केला. तेव्हापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. परंतु अशा स्थितीत भारताने संयमाने आणि रणनीतीने घेतलेल्या भूमिकेचे कौतुक होत आहे.
७ मे मध्यरात्री १.३० वाजल्यापासून ते १० मे सायंकाळी ५ वाजेपर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव व लष्करी कारवाई टोकाला पोहोचली होती. त्यामुळे दोन्ही देशांत युद्ध होईल की काय, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरही इतर देशांचे लक्ष भारताकडे लागले होते. मात्र, गेल्या ३ दिवसांत भारताने नव्या भारताचे नवे रुप दाखवले. रणनीती ते युद्धभूमीपर्यंत भारत सरकार आणि भारतीय सैन्य दलाने दाखवलेल्या सामर्थ्यशाली युद्धनितीचे कौतुक होत आहे.
भारताने पाकिस्तानात घुसून कारवाई केली. दहशतवादाविरूद्धची आपली भूमिका आजही ठाम असल्याचे आणि त्यासाठी कुठलीही तडजोड करणार नसल्याचे पाकिस्तानला दाखवून दिले. त्यानंतर इंडियन एअरफोर्सचे शक्तीशाली रुप दिसले, वायूदलाने आधी ढाल बनून हल्ले रोखले. त्यानंतर तलवार बनून चाल केली, टार्गेट ठेवून दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले तर पाकिस्तानने ४०० पेक्षा जास्त ड्रोन हवेत सोडून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ते ड्रोन भारतीय सैन्याने हवेत जिरवले.
समुद्री हल्ल्यातून दाखविली ताकद
भारताने नेव्हीलाही सज्ज ठेवून पाकिस्तानला समुद्री हल्ल्याच्या अनामिक भीतीत ठेवले. आयएनएस विक्रांतसह भारताच्या युद्धनौका पूर्ण ताकदिनीशी समुद्रात उतरल्या. त्यामुळे, बलसागर भारत जगभरातील देशांना पाहायला मिळाला. लष्कर-आर्मी-भारतीय सैन्य दलाने तिन्ही स्तरावर आपले सामर्थ्य दाखवून दिले. भूदल, नौदल आणि वायूदलाने प्रत्येक कारवाईला चोख प्रत्युत्तर दिले.