35.8 C
Latur
Monday, May 12, 2025
Homeसंपादकीययुद्धविरामहराम!

युद्धविरामहराम!

जित्त्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, जब गिदड की मौत आती है तब वो शहर की ओर भागता है, नमकहराम, युद्धविरामहराम अशी कितीतरी विशेषणे दिली तरी ती विश्वासघातकी पाकिस्तानसाठी कमीच पडतील. पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताशी युद्ध छेडणा-या पाकिस्तानने खरपूस मार मिळाल्यानंतर आणि दाणादाण उडाल्यानंतर शनिवारी (१० मे) दुपारी ‘युद्ध नको’चे पांढरे निशाण फडकावत भारतासमोर सपशेल लोटांगण घातले आणि शस्त्रसंधी करण्याची विनंती केली. भारताला दहशतवादाचा बंदोबस्त करायचा होता, त्यांनी केलेल्या कृत्याबद्दल त्यांना कडक शिक्षा द्यायची होती, चांगला धडा शिकवायचा होता. ते उद्दिष्ट साध्य झाल्यामुळे सशर्त अटीनुसार भारताने युद्धविराम करण्यास होकार दिला. संध्याकाळी पाच वाजल्यापासून दोन्ही देशांत युद्धबंदी झाल्याची घोषणा करण्यात आली. तीन दिवसांच्या तीव्र संघर्षानंतर भारत-पाकमध्ये शस्त्रसंधीवर सहमती झाली होती. मात्र त्याचवेळी यापुढे भारताविरोधात कुरापती न करण्याची सज्जड ताकीदही देण्यात आली होती. कोणतीही अतिरेकी कृती झाल्यास (अ‍ॅक्ट्स ऑफ टेरर) ती ‘अ‍ॅक्ट्स ऑफ वॉर’ समजली जाईल अशा स्पष्ट शब्दांत पाकला बजावण्यात आले होते.

शस्त्रसंधी करताना भारताने कोणत्याही अटी-शर्ती मान्य केलेल्या नाहीत. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने संध्याकाळी सव्वा सहा वाजता युद्धबंदीची अधिकृत घोषणा केली. त्याच्या काही मिनिटे आधी पाकचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनी पाकिस्तान आणि भारत यांच्यात तात्काळ युद्धविराम करण्यास सहमती झाल्याचे सांगितले होते. शस्त्रसंधीसाठी अमेरिकेने मध्यस्थाची प्रमुख भूमिका बजावल्याचे सांगण्यात आले असले तरी द्विपक्षीय चर्चेतूनच तोडगा निघाल्याची भूमिका भारताने घेतली होती. भारत-पाकिस्तान यांच्यात होत असलेला गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्यावर सहमती झाली आहे. कुठल्याही स्वरूपातील दहशतवाद सहन केला जाणार नाही. त्याविरोधातील कारवाईबाबत तडजोड केली जाणार नाही, ही भूमिका भारताने सातत्याने घेतली आहे. ही भूमिका कायम राहील असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले होते. इतके सारे स्पष्ट होऊनही अखेर पाकिस्तानने ‘पालथ्या घड्यावर पाणी’ घातलेच! युद्धविरामानंतर अवघ्या तीन तासांत पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन करत आपली लायकी दाखवली. रात्री काश्मीर, राजस्थान, पंजाबमध्ये पाकिस्तानी सैन्याने गोळीबार आणि ड्रोन हल्ले करून युद्धबंदी मोडली. संध्याकाळी ५ वाजता युद्धबंदी सुरू झाल्यानंतर पंजाब, राजस्थान आणि काश्मीरच्या सीमारेषेवरील दुकाने सुरू झाली. स्थानिक लोकांची बाजारपेठेत वर्दळ सुरू झाली होती.

मुले खेळण्यासाठी मैदानात उतरली होती. मात्र, रात्री साडेआठपासून पाकिस्तानी लष्कराने युद्धबंदीचे उल्लंघन करून श्रीनगरसह विमानतळ, लाल चौक, राजौरी, बारामुल्ला, सांबा, वैष्णोदेवी मंदिर परिसर, मेंढर, अखनूर, फिरोजपूर, उधमपूर, पोखरण, रामगढ, अबडासा, जखाऊ, बाडमेर, नलिया लष्करी विमानतळ, कच्छ, जैसलमेर भागात शेकडो ड्रोनद्वारे हल्ला केला. मात्र, सावध असलेल्या भारतीय जवानांनी सारे ड्रोन हवेतच नष्ट केले. कारवाईवेळी या भागासह जम्मू, पठाणकोट, अमृतसर आणि भूजमध्ये सायरन वाजवत ब्लॅक आऊट करण्यात आले. अखनूर, राजौरी, बारामुल्ला आणि सांबा सीमेवर पाकिस्तानी लष्कराने तोफगोळ्यांसह गोळीबार केला. युद्धबंदीनंतरही पुन्हा तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. या हल्ल्यानंतर रात्री ११ वाजता परराष्ट्र मंत्रालयाचे विदेश सचिव विक्रम मिस्त्री यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केल्याचे आणि आपल्या जवानांना कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगितले.

युद्धबंदी करताना भारताने स्पष्ट केले आहे की, सिंधू जलवाटप करार स्थगितच राहील. भारताने पाकिस्तानवर लादलेले निर्बंधही कायम राहतील. पहलगाममधील दहशती हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात अनेक राजनैतिक निर्णय घेतले असून जलवाटप कराराला स्थगिती दिली आहे. पाकने पुन्हा एकदा चिथावणीखोर आणि तणाव वाढवणारी कारवाई केली आहे. पूंछमधील गुरुद्वारावरही त्यांनी हल्ला केला, त्यात गुरुद्वारातील काही बांधवांचे प्राणही गेले. परंतु भारतीय सैन्य आणि हवाई दल आपल्याच शहरांवर हल्ले करत आहे आणि पाकिस्तानला दोष देण्यात येत आहे असा कांगावाही पाकने केला आहे. जगाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न पाक नेहमीच करतो. त्याची ही जित्त्याची खोड आहे. पाकिस्तानातील नानकाना साहिब गुरुद्वारावर भारत ड्रोनहल्ले करत असल्याचा दावाही पाकने केला आहे. हाही पाकिस्तानच्या अपप्रचाराचाच एक भाग आहे. पहलगाम हल्ल्यापासून पाकिस्तानने ही मोहीम सुरू केली आहे. सुरुवातीपासूनच ते अशा गोष्टींना धार्मिक रंग देत आहेत. पाकने जम्मूतील शंभू मंदिरावरही हल्ला केला. पाकने डागलेले क्षेपणास्त्र मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पडले.

त्यामुळे नुकसान झाले नाही. पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरेशी यांनी पाकिस्तान काश्मीरमधील शाळा आणि आरोग्य केंद्रांनाही लक्ष्य करत असल्याचे सांगितले. श्रीनगर, अवंतीपूर आणि उधमपूर येथील हवाई तळांसह पाकिस्तानने रुग्णालयाच्या इमारती व शाळांच्या परिसरांवरही हल्ले केले. पाकच्या या कृतीनंतर भारतानेही प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानच्या रावळपिंडी, चकवाला, शोरकोट, सेंट्रल पंजाब, सियालकोटमधील एअरबेस उद्ध्वस्त केले आणि इस्लामाबादमधील चकवाला या पाकिस्तानी लष्करी तळांवर हल्ला केला. भारताने कमीतकमी नुकसान होईल यासाठी प्रयत्न केले. या उलट पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय हवाई मार्गाचा गैरवापर केला. नागरी विमानाच्या आड भारतावर हवाई हल्ले केले. पाकने आदमपूर, सुरतपूर, एस ४०० प्रणाली, नगरोटा दारूगोळा केंद्र, ब्राह्मोस क्षेपणास्त्रे नष्ट केल्याचा दावा केला तो पूर्णपणे खोटा आहे. युद्धविरामानंतर अवघ्या तीन तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जाते याचा अर्थ असा की पाक नेतृत्व आणि लष्कर यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. लष्कर म्हणेल तीच पूर्वदिशा अशी तेथील परिस्थिती आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR