32.1 C
Latur
Monday, April 28, 2025
Homeसंपादकीययुद्धाचे ढग

युद्धाचे ढग

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध पेटण्याची शक्यता वाढली आहे. पहलगाममधील अतिरेकी हल्ल्यामागे पाकिस्तानचा थेट हात होता हे भारताने जगाला पटवून दिले आहे. त्यासाठी आवश्यक असलेले गुप्तचर पुरावेसुद्धा सादर केले आहेत त्यामुळे भारताला जगभरातून पाठिंबा मिळत आहे. पंतप्रधान मोदींनी १६ देशांच्या प्रमुखांशी थेट संवाद साधला आहे. सर्व नेत्यांनी या हल्ल्याचा कठोर शब्दांत निषेध केला असून भारताला पाठिंबा दिला आहे. भारत-पाकिस्तान सीमेवर तणावाची परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना इराणने म्हटले आहे की, दोन्ही देशांनी शांततेची भूमिका घ्यावी, तणाव कमी करावा. इराणचे परराष्ट्रमंत्री सैयद अब्बास म्हणाले, भारत आणि पाकिस्तान आमचे शेजारी देश आहेत. त्यांच्याशी आमचे शेकडो वर्षापासून सांस्कृतिक आणि व्यापारी संबंध आहेत.

इतर देशांप्रमाणेच आम्हीही या संबंधांना प्राथमिकता देतो. अशा कठीण परिस्थितीत दोन्ही देशांनी सामंजस्याने भूमिका घ्यावी. सौदी अरेबियानेसुद्धा भारत-पाकमध्ये वाढत असलेल्या तणावावर चिंता व्यक्त केली आहे. सौदीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पाकिस्तान आणि भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांना फोन करून परिस्थितीची माहिती घेतली. अमेरिकेनेदेखील भारत-पाकमधील तणावपूर्ण परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. भारत-पाक हे दोन्ही देश आमच्यासाठी जवळचे आहेत. दोन्ही देशात कायमचा तणाव राहिला आहे मात्र ते त्यावर तोडगा काढतील, असा आम्हाला विश्वास वाटतो. पाकिस्तान उसने अवसान आणून युद्धाच्या पोकळ धमक्या देत असला तरी प्रत्यक्ष युद्ध पेटलेच तर भारतापुढे त्यांचा क्षणभरही टिकाव लागणार नाही. पाकमध्ये अंतर्गत बंडाळी माजली आहे. स्वतंत्र बलुचिस्तानच्या मागणीसाठी बलूच बंडखोर पाक सैन्यावर सतत हल्ले चढवत आहेत.

कधी रेल्वे हायजॅक तर कधी पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर हल्ले अशा पद्धतीने बलूच लिबरेशन आर्मी सातत्याने पाकिस्तानी सैन्याला लक्ष्य करीत आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्येसुद्धा असंतोष उफाळून आला आहे. हजारो नागरिक पाकिस्तान सरकार विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. पाकिस्तान सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. भारताने पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्यावा या मागणीने जोर धरला आहे. आधीच पाकिस्तानचे दोन तुकडे झाले आहेत. आता तिसरा तुकडा पाडल्याशिवाय त्यांची गुर्मी उतरणार नाही, असे मत भारतातील संरक्षण तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. यामुळे भारताने कोणत्याही प्रकारची कारवाई करून बळकावलेला काश्मीर ताब्यात घ्यावा, अशी मागणी देशभरातून केली जात आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कराच्या तिन्ही दलांकडून युद्ध सराव सुरू आहे. सीमेवर पाककडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. त्याला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. आतापर्यंत ९ दहशतवाद्यांची घरे उडवून देण्यात आली आहेत.

साडेचारशेच्या आसपास संशयित ताब्यात घेण्यात आले आहेत. गत दोन दशकांमधील हे सर्वांत मोठे कोम्बिंग ऑपरेशन आहे. दहशतवाद्यांना पोसणा-या पाकच्या पापाचा घडा आता भरला आहे. दहशतवादी कारवायांना बळ देत त्यांनी भारताविरुद्ध छुपे युद्ध सुरू ठेवले होते. आता पाकला धडा शिकवावा, अशी असंख्य भारतीयांची मागणी आहे. भारत आपल्यावर कधीही हल्ला करू शकतो, असे पाकिस्तानी लोकांनाही वाटते म्हणून ते काळजीत पडले आहेत. पाकिस्तानी प्रशासनही हादरून गेले आहे म्हणूनच की काय पाकिस्तानी लष्करामध्येही हालचाली वाढल्या आहेत. भारत-पाक सीमेवर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी लष्करातील सुमारे ५ हजार जवानांनी आपल्या नोकरीवर पाणी सोडले आहे. पाकिस्तानी लष्करातील सुमारे ५ हजार सैनिक आणि अधिका-यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले असून ते आपापल्या घरी परतले आहेत म्हणे.

पेशावर स्थित पाक लष्कराच्या ११ व्या कोअरचे कमांडर ले. जन. उमर बुखारी यांनी पाक लष्करप्रमुख असीम मुनीर यांना पत्र पाठवले असून त्यांना या राजीनाम्यांची माहिती देण्यात आली आहे. हे राजीनामा सत्र थांबवण्यात यावे कारण या कृतीमुळे लष्करात वेगळा संदेश जात असून त्यामुळे इतर सैनिकांचे खच्चीकरण होऊ शकते, असेही पत्रात म्हटले आहे. पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे मोठे बंधू माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारताशी पंगा न घेण्याचा सल्ला दिल्याचे सांगण्यात येते. नवाज शरीफ यांनी भारतासोबतचे ताणलेले संबंध सुधारण्यासाठी शाहबाज शरीफ यांना राजनैतिक पातळीवर हा प्रश्न सोडवण्याचा सल्ला दिला आहे. भारतासोबत युद्ध होणे पाकच्या दृष्टीने हिताचे नाही, असे त्यांनी म्हटले आहे. युद्धाची शक्यता लक्षात घेऊन पाकिस्तानातील अनेक लष्करी अधिका-यांनी आणि नेत्यांनी आपल्या कुटुंबीयांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्राने दोन्ही देशांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

संयुक्त राष्ट्राने २४ एप्रिलला पत्रकार परिषद घेऊन पहलगाममधील कट्टरतावादी हल्ल्याचा निषेध केला तसेच दोन्ही देशांनी जास्तीत जास्त संयम बाळगावा आणि दोन्ही देशांमधील परिस्थिती आणखी बिघडू नये याची काळजी घ्यावी, असे म्हटले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीयाची ही भावना आहे की, पाकिस्तानच्या विरोधात जोरदार कारवाई केली जावी. पाकिस्तान दहशतवाद्यांना कसं पोसतो, ट्रेनिंग देतो ते सा-या जगाला माहित आहे. दहशतवाद्यांना तयार करण्याचा हा पाकिस्तानी पॅटर्न आहे. तरुणांची माथी भडकावली जातात, त्यांना चिथावणी दिली जाते आणि मग हातात हत्यार देऊन त्यांना ट्रेनिंग दिलं जातं. एवढं सारं करूनही पाकिस्तान जबाबदारी झटकतो; परंतु परदेशातील एजन्सीकडून सत्य समोर येतच!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR