लातूर : प्रतिनिधी
केंद्र सरकारने बालविवाह विरोधी ‘बाल विवाहमुक्त भारत’ मोहिमेचा शुभारंभ केला असतानाच जिल्हा प्रशासनाने सुद्धा जिल्ह्यात युवा रुरल असोसिएशन च्या सहकार्याने रॅल्या, शपथविधी समारंभ आयोजित करण्याची तयारी केली आहे. याच अनुषंगाने सोनवती येथे आयोजित ‘बाल विवाहमुक्त भारत’ मोहिमेमध्ये गावातील ४०० हून अधिक लोकांनी कॅण्डल मार्च काढून ‘बाल विवाहमुक्त भारत’ विषयी बालविवाह विरुद्ध शपथ घेतली. या वेळी युवा रुरल असोसिएशनकार्यक्रम समन्वयक सद्दाम शेख यांनी उपस्थितांना शपथ दिली.
दरम्यान,केंद्र सरकारने नवी दिल्ली येथे देशव्यापी ‘बाल विवाहमुक्त भारत’ मोहिम सुरू केल्याने जिल्हा प्रशासनाने बालविवाहाविरोधात रॅलींचे, शपथविधी समारंभांचे आयोजन करत आहे. जस्ट राइट्स फॉर चिल्ड्रन (जेआरसी) हे देशभरातील ४०० हून अधिक जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या २५० पेक्षा जास्त बाल संरक्षण एनजीओ भागीदारांचे राष्ट्रीय नेटवर्क आहे आणि युवा रुरल असोसिएशन ही त्यात युतीचा भागीदार आहे.
२७ नोव्हेंबर रोजी बालविवाह निर्मूलनासाठी महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी ‘बाल विवाहमुक्त भारत’ मोहिम जाहीर केली होती आणि तिला प्रतिसाद म्हणून जिल्ह्यात या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते. त्यांनी देशातील सर्व ग्रामपंचायती आणि शाळांना बालविवाहविरोधी शपथ दिली असून ही मोहिम २५ कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा केली जात आहे. बालविवाहाची माहिती देणे सोपे जावे म्हणून एका राष्ट्रीय पोर्टलचे अनावरण सुद्धा यावेळी करण्यात आले.
या देशव्यापी मोहिमेबद्दल आणि त्यामुळे वास्तविक स्वरूपात त्यांचे काम लवकर कसे होईल, याविषयी बोलताना युवा रुरल असोसिएशन चे कार्यक्रम समन्वयक सद्दाम शेख म्हणाले, बालविवाहांबाबत जनजागृती करण्यासाठी, असे कोणतेही विवाह रोखण्यासाठी आम्ही सरकारी अधिकारी आणि स्थानिक प्रमुख यांच्यासमवेत जिल्ह्या काम करीत आहोत आणि त्यासोबतच सरकारच्या या मोहिमेमुळे या लढ्याला नवी ऊर्जा आणि पाठबळ लाभणार आहे. अखेर बालविवाह संपुष्टात आल्याने इतकी वर्षे आम्ही ज्या लढाईत होतो ती संपण्याच्या मार्गावर आहे.