धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव तालुक्यातील येडशी येथील लातूर-बार्शी महामार्गावरील घाटात ट्रक उलटला. या अपघातात चालकाचा मृत्यू झाला. हा अपघात दि. ८ जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे येथे दि. १२ जानेवारी रोजी मयत ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, बार्शी तालुक्यातील शेलगाव मा. येथील भगवान रामलिंग बारबोले हे दि. ८ जानेवारी रोजी ट्रकमध्ये हरभरा भरून लातूरला गेले होते. ट्रकमधील हरभरा लातूर येथे खाली करुन बार्शीकडे जात होते. दरम्यान, त्यांचा ट्रक येडशी घाट उतरत असताना उलटला. चालकाने त्यांचा ट्रक हायगई व निष्काळजीपणे चालवून ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक घाटातील डोंगर कट्ट्याला जावून धडकला. या अपघातात भगवान बारबोले हे गंभीर जखमी होवून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मयताचा मुलगा प्रकाश भगवान बारबोले यांनी दि.१२ जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.