37.8 C
Latur
Saturday, March 29, 2025
Homeमहाराष्ट्रयेत्या काही दिवसात मविआचे पदाधिकारी राष्ट्रवादीत येतील - सुनिल तटकरे

येत्या काही दिवसात मविआचे पदाधिकारी राष्ट्रवादीत येतील – सुनिल तटकरे

मुंबई : प्रतिनिधी
महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी येत्या काही दिवसात अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश करतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला. रायगड जिल्ह्यात एक वलय निर्माण करण्यात माणिकराव जगताप हे यशस्वी झाले आहेत. महाड – पोलादपूर इथल्या जनतेने त्यांच्यावर भरपूर प्रेम केले आहे. माझ्या लोकसभा निवडणुकीत स्रेहल जगताप हिने मला मदत केली नाही. शिवाय विधानसभा निवडणुकीत माझी मदत स्रेहल जगताप यांना झाली नाही हेही आवर्जून सुनिल तटकरे यांनी सांगितले.

दरम्यान, महाड – पोलादपूर मतदारसंघातील उबाठा गटाच्या असंख्य पदाधिका-यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामध्ये महाड – पोलादपूर मतदारसंघातील उबाठा गटाच्या नेत्या स्रेहल जगताप यांच्यासह रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक हनुमंत जगताप,श्रेयस जगताप,तसेच शेतकरी कामगार पक्षाचे नेते जिल्हा परिषदचे माजी सभापती नारायण डामसे,माजी सभापती जयवंतीताई हिंदूळा आदींसह कर्जत तालुक्यातील असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

देशात आणि राज्यात सत्ता आल्यानंतर लोककल्याणकारी कामे आपण करत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष विचाराने आज अनेक लोक पक्षासोबत जोडली जात आहेत. सामाजिक समतेचा हुंकार ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला त्या भूमीत काम करताना राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद तुमच्या पाठीशी उभी केली जाईल असा शब्द सुनिल तटकरे यांनी दिला.

महाड पोलादपूर विधानसभा मतदारसंघात ९२ हजार मते मिळाली परंतु मला विजयापर्यंत जाता आले नाही. मात्र ज्यांनी संधी दिली आणि ज्यांनी विरोधात काम केले त्यांचे आभार महाडच्या माजी नगराध्यक्षा स्रेहल जगताप यांनी मानले.

तळा, म्हसळा या तालुक्यांचा विकास ज्यापध्दतीने केला जात आहे त्याचपध्दतीने महाड – पोलादपूरचा विकासही तटकरेसाहेबांनी करावा अशी अपेक्षा स्रेहल जगताप यांनी व्यक्त केली.
१९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला त्यावेळी माझे वडील पक्षाचे सदस्य होते. आज मला या कुटुंबात परत आल्याचे समाधान वाटत असल्याचे स्रेहल जगताप म्हणाल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR