30.9 C
Latur
Tuesday, April 1, 2025
Homeमुख्य बातम्यायेत्या १० वर्षात ‘एआय’मुळे शिक्षक, डॉक्टर दुर्मिळ होणार! बिल गेटस्च्या मते केवळ ३ जॉब...

येत्या १० वर्षात ‘एआय’मुळे शिक्षक, डॉक्टर दुर्मिळ होणार! बिल गेटस्च्या मते केवळ ३ जॉब सुरक्षित

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अलीकडच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) मुळे अनेक कामे सुलभ झाली आहेत. अनेक नोक-यांमध्ये महत्वाची कामगिरी ‘एआय’ पार पाडत आहे. एकंदरीत जगभरात ‘एआय’ मुळे अनेक नोक-या धोक्यात आलेल्या असताना मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक बिल गेट्स यांनी ‘एआय’च्या आक्रमणातही सुरक्षित राहतील अशा तीन नोक-या सांगितल्या आहेत. ते पुढीलप्रमाणे….
१) कोडिंग : गेट्स यांच्या मते, ‘एआय’ सिस्टम जे विकसित करतात आणि कोड लिहितात त्यांची नोकरी सुरक्षित आहे. कारण जरी ‘एआय’ कोड जनरेट करू शकत असला, तरी सॉफ्टवेअर विकासासाठी आवश्यक असलेले अष्टपैलुत्व, समस्या सोडवण्याची क्षमता आणि अचूकता ‘एआय’कडे नाही. विशेषत:, डी-बगिंग, सुधारणा करणे आणि ‘एआय’ला पुढे नेण्यासाठी मानवी हस्तक्षेप आवश्यकच राहील.

२) जीवशास्त्र : गेट्स म्हणाले की, जरी ‘एआय’ मोठ्या प्रमाणातील डेटाचा वेगाने अभ्यास करू शकतो आणि आजारांचे निदान करण्यात मदत करू शकतो, तरीही वैज्ञानिक संशोधन आणि चिकित्सक विचारसरणी त्याला आत्मसात करता आलेली नाही. ‘एआय’ला स्वतंत्रपणे संकल्पना मांडता येत नाहीत, त्यामुळे भविष्यातही जीवशास्त्रज्ञ वैद्यकीय क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत राहतील.

३) ऊर्जा क्षेत्र : ऊर्जा क्षेत्राबद्दल बोलताना गेट्स म्हणाले की, जरी ‘एआय’मुळे कार्यक्षमता वाढू शकते, तरीही हे एक गुंतागुंतीचे क्षेत्र आहे, त्यामुळे यात मानवी तज्ज्ञांची भूमिका अनिवार्य आहे. विशेषत: संकट व्यवस्थापन आणि दीर्घकालीन धोरणात्मक नियोजन यामध्ये मानवी निर्णय अत्यंत महत्त्वाचे राहतील. पुढील दशकात बहुतेक गोष्टींसाठी मानवी हस्तक्षेपाची गरज राहणार नाही.

‘द टुनाईट शो स्टॅरिंग जिमी फॅलन’ या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत बिल गेट्स म्हणाले की, ‘एआय’मुळे नोक-यांना खरोखरच धोका निर्माण झाला आहे. पुढील दशकभरात बहुतेक गोष्टींसाठी मानवी हस्तक्षेपाची गरज राहणार नाही. सध्या काही तज्ज्ञ दुर्मिळ आहेत, म्हणूनच आपण अजूनही उत्कृष्ट डॉक्टर किंवा उत्कृष्ट शिक्षकांवर अवलंबून आहोत. पण पुढील दशकात एआयमुळे ही सेवा मोफत आणि सहज उपलब्ध होईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR